राखी सावंतच्या अडचणींत मोठी वाढ! तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी

Rakhi Sawant | बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणींत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सुमारे १६ वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोदरम्यान केलेल्या अपमानानंतर एका तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात झाशी न्यायालयाने राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. सुनावणीसाठी न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
हे संपूर्ण प्रकरण २०१० मधील ‘राखी का इन्साफ’ या वादग्रस्त टीव्ही शोशी संबंधित आहे. झाशी येथील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी लक्ष्मण अहिरवार हा तरुण आपल्या पत्नीसोबतचा कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी या शोमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमादरम्यान राखी सावंतने लक्ष्मणबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य करत त्याला नपुंसक म्हटले होते. शोमधील या अपमानामुळे लक्ष्मण गंभीर मानसिक नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
हेही वाचा
कुठे गेले रामराज्य? सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारवर टीका
लक्ष्मणच्या मृत्यूनंतर त्याच्या आई सावित्री यांनी प्रेमनगर पोलीस ठाण्यात राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या हे प्रकरण झाशीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. जिल्हा सरकारी वकील मृदुल कांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्याच्या सुनावणीसाठी राखी सावंत सातत्याने न्यायालयात अनुपस्थित राहत होती. न्यायालयाच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे अखेर न्यायालयाने शुक्रवारी तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
१ डिसेंबरला पुढील सुनावणी; अटकेची शक्यता
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याने पोलिसांना राखी सावंतला अटक करून थेट न्यायालयात हजर करावे लागणार आहे. कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘राखी का इन्साफ’ या शोच्या कार्यपद्धतीवर आणि टीआरपीसाठी केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीवर या दुर्घटनेनंतर देशभर तीव्र टीका झाली होती. आता न्यायालयाच्या या वॉरंटमुळे राखी सावंतवर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.




