TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘ईव्हीएमवर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा विजयाचा विश्वास; सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा, महायुतीत सकारात्मक घडामोडींची अपेक्षा

सोलापूर : विधानपरिषदेच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील लढतीकडे विशेष लक्ष लागले असताना, भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “निवडणुका ईव्हीएम मशीनवर घ्या किंवा कागदावर घ्या, जिंकणार तर आम्हीच आहोत,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या ईव्हीएमविषयक भूमिकेवर टीका केली. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.

‘नाचता येईना, अंगण वाकडे’

विरोधकांकडून ईव्हीएमच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “विरोधकांची परिस्थिती म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडे अशी आहे,” असा टोला लगावला.

दिल्ली विद्यापीठातील कागदी मतपत्रिकांवर झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चारपैकी तीन जागा जिंकल्याचा, तसेच ओडिशातील विद्यापीठांच्या निवडणुकांमध्येही संघटनेला यश मिळाल्याचा दाखला त्यांनी दिला. निवडणुका कोणत्याही पद्धतीने घेतल्या, तरी भाजप आणि संबंधित संघटनांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  ‘संजय राऊतांचा पोपट नेहमी चुकीची चिट्ठी काढतो’; शंभूराज देसाईंचा टोला

सचिन सानप यांच्या पाठिंब्यावरून महायुतीत चर्चा

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या निर्णयाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा ही बॅड न्यूज नक्की आहे; पण अजून दोन दिवस आहेत. त्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, अशी अपेक्षा आहे.”

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी “नाईलाज को क्या इलाज” असेही म्हटले. त्याचवेळी महायुतीतील मित्रपक्षांवर टीका करू नये, असे आवाहन त्यांनी पक्षातील नेत्यांना केले.

ईव्हीएम, एसआयआरवरून निवडणूक आयोग चर्चेत

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या वापराबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असून, निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही आरोप केले आहेत.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पद्धतीपेक्षा विजय महत्त्वाचा असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत महायुतीला कितपत यश मिळते, तसेच सचिन सानप यांच्या उमेदवारीमुळे मतांचे समीकरण कसे बदलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button