महाराष्ट्रातील तरुणांसाठी परदेशात रोजगाराच्या संधींचे नवे दालन; ‘जीएसएमएआय’च्या माध्यमातून जागतिक कौशल्यांना बळ – मुख्यमंत्री फडणवीस
कौशल्य प्रशिक्षण, परदेशी भाषांचे ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी समन्वय; ‘महिमा’ संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरावरील युवकांनाही जागतिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर

मुंबई : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. कौशल्य प्रशिक्षण, परदेशी भाषांचे ज्ञान, जागतिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी ‘ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ (जीएसएमएआय) महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘जीएसएमएआय’ची १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील आयटीसी मौर्या येथे औपचारिक स्थापना करण्यात आली. या उपक्रमात १७ संस्थापक संस्था, शासकीय प्रतिनिधी, राजनैतिक दूतावास, राज्य सरकारे आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले.
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक रोजगाराची संधी
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्यांच्या बळावर परदेशात रोजगाराच्या उत्तम संधी मिळण्याची आवश्यकता अधोरेखित केली. राज्यातील दुर्गम भागांतील तरुण-तरुणींनाही जगातील विविध देशांमध्ये करिअर घडविण्याचा आत्मविश्वास मिळावा, यासाठी आवश्यक कौशल्ये, आर्थिक सहाय्य आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक रोजगाराच्या संधी केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित न राहता राज्यातील सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘जीएसएमएआय’च्या लोगो आणि वेबसाइटचे अनावरण
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या हस्ते ‘जीएसएमएआय’च्या लोगोचे आणि वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. जागतिक कौशल्य गतिशीलतेकडे केवळ कामगारांचे स्थलांतर म्हणून न पाहता, तरुणांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आणि भारताच्या विकासात योगदान देण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मिसरी यांनी नमूद केले.
‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी जागतिक रोजगारासाठी विश्वासार्ह मार्ग निर्माण करण्याकरिता उद्योग क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमामुळे विश्वासार्हतेला प्राधान्य देत जागतिक रोजगारासाठी मजबूत संस्थात्मक व्यवस्था उभारण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला खासदार तथा संसदेच्या कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकासविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशांक मणी, डेन्मार्कचे भारतातील राजदूत रास्मस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन, जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झवायलर, इटलीच्या दूतावासाच्या उपप्रमुख ऑरोरा रुसी, ओडिशा शासनाचे सचिव भूपेंद्र सिंह पूनिया, टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा, क्वेस कॉर्पचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित भाटिया, बॉर्डरप्लसचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार, मॅजिक बिलियनचे सहसंस्थापक बसब बॅनर्जी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या श्रद्धा लोंढेची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; ‘इन्स्पायर–मानक’मध्ये प्रथम क्रमांक
कौशल्य प्रशिक्षणासोबत भाषेचे आणि संस्कृतीचे ज्ञान महत्त्वाचे
जागतिक रोजगाराच्या संधींसाठी भारतीय युवकांना तयार करताना उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण, परदेशी भाषांचे ज्ञान, सांस्कृतिक समज आणि रोजगार मिळाल्यानंतर आवश्यक सहकार्य या बाबी महत्त्वाच्या आहेत. या विषयावर आयोजित परिसंवादात ओडिशा शासनाचे भूपेंद्र सिंह पूनिया, टीमलीज डिजिटलच्या नीती शर्मा आणि क्वेस कॉर्पचे लोहित भाटिया यांनी सहभाग घेतला. बॉर्डरप्लसचे मयंक कुमार यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले, तर मॅजिक बिलियनचे बसब बॅनर्जी यांनी समारोप केला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रातील युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाश्वत मार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जीएसएमएआय’च्या सहकार्यामुळे राज्यातील कौशल्य विकास व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल. जागतिक गरजांनुसार युवकांना प्रशिक्षित करून त्यांच्या क्षमता आणि गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे लोढा यांनी नमूद केले.
‘महिमा’च्या माध्यमातून परदेशातील रोजगाराच्या संधी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महिमा’ या उपक्रमाची माहिती दिली. ‘महिमा’ म्हणजे महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था. विशेष कलम ८ अंतर्गत कंपनी म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली असून, परदेशातील रोजगाराच्या संधी सुलभ करणे आणि जागतिक कौशल्य गतिशीलतेला चालना देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.
जागतिक स्तरावरील मनुष्यबळाच्या मागणीचे रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विविध देशांतील व्यवसायनिहाय मनुष्यबळाची मागणी ओळखून जिल्हास्तरावरील युवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी उद्योग भागीदार, नियोक्ता नेटवर्क, भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कौशल्ये आणि प्रशिक्षण क्षमता यांच्यात समन्वय साधला जात आहे.
महाराष्ट्राच्या कौशल्य विकास परिसंस्थेत एक हजारांहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि एक हजार आठशेहून अधिक तांत्रिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ विकसित करण्यासाठी या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.
या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये, मार्गदर्शन आणि संस्थात्मक सहाय्य मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. त्यातून युवकांना जागतिक स्तरावर करिअर घडविण्याची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही उपयोग होऊ शकतो.




