नवरात्रोत्सवात १९ व २० ऑक्टोबरला रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना सशर्त मुभा; पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
उत्सवाची तयारी : पुणे जिल्ह्यात वर्षातील १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकांना सशर्त मुभा

पुणे | धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने २०२६ मधील निर्धारित १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. या सवलतीमध्ये नवरात्रोत्सवातील १९ आणि २० ऑक्टोबर या दोन दिवसांचा समावेश आहे. मात्र, वेळेची सवलत दिली असली तरी आवाजाच्या निर्धारित मर्यादांचे पालन बंधनकारक राहणार आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील नियम ५(३), तसेच २०१७ मधील सुधारणांच्या आधारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश जारी केला आहे. ही सूट केवळ अधिसूचित दिवसांसाठी आणि आदेशातील अटींच्या अधीन राहून लागू असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या सण-उत्सवांचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल आणि महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी सवलत देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतील निर्धारित दिवस, सप्टेंबरमधील ईद-ए-मिलाद, तसेच गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने १९, २०, २२, २३, २४ आणि २५ सप्टेंबर या तारखांचाही उल्लेख आहे.
नवरात्रोत्सवासाठी १९ व २० ऑक्टोबर, नाताळनिमित्त २५ डिसेंबर आणि वर्षअखेरीनिमित्त ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास सशर्त मुभा असेल. याशिवाय अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मंजुरीच्या अधीन दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा
“बांगलादेशच्या धर्तीवर भारतात सत्तापालटाचा कट”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा
ध्वनिमर्यादा कायम; शांतता क्षेत्रांना सूट नाही
निवासी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी निर्धारित केलेल्या ध्वनिमर्यादा या दिवसांमध्येही लागू राहणार आहेत. अधिसूचित शांतता क्षेत्रांमध्ये ही सवलत लागू होणार नाही. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरातील अधिसूचित शांतता क्षेत्रांचे निर्बंध पाळणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते. अंमलबजावणी यंत्रणांना नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पारंपरिक आणि सामुदायिक उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आयोजकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आदेशातील अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.




