“बांगलादेशच्या धर्तीवर भारतात सत्तापालटाचा कट”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरोधात राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी (‘सीजेपी’) आणि ‘इंडिया’ आघाडीचे सुरू असलेले आंदोलन आता देशपातळीवर पेटले आहे. या आंदोलनावर केंद्र सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. “लोकशाही म्हणजे देशात अराजकता पसरवण्याचा परवाना नव्हे,” असा सज्जड दम भरतानाच, “काही लोक बांगलादेशातील घडामोडींच्या धर्तीवर भारतात सत्तापालट घडवून आणण्याचा कट रचत आहेत,” असा खळबळजनक आरोप राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनांवर बोट ठेवत संरक्षणमंत्री म्हणाले की, या आंदोलनातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. “काँग्रेस आणि त्यांचे राजकीय मित्रपक्ष थेट किंवा संलग्न संघटनांमार्फत देशातील तरुणांची दिशाभूल करत आहेत. तरुणांची ऊर्जा राष्ट्र उभारणीकडे वळवण्याऐवजी त्यांना राजकीय संघर्ष आणि अराजकता माजवण्याचे साधन (प्यादे) बनवले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
हेही वाचा
डोंगराळे अत्याचार व हत्याकांड प्रकरण: नराधम विजय खैरनारला फाशीची शिक्षा
विरोधी पक्षांच्या मूळ हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजनाथ सिंह म्हणाले, “बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण करून सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने उघडपणे सत्तापालटाचा उल्लेख केला होता. यावरून त्यांचा अजेंडा स्पष्ट होतो; लोकशाही संस्था उद्ध्वस्त करणे आणि देशाला आगीच्या खाईत लोटणे हाच त्यांचा एकमेव हेतू आहे. ही लढाई ना निवडणूक सुधारणांची आहे, ना एसआयआरविरोधातील आहे, ना ज्ञानेश कुमारांविरोधातील. देशातील तरुणांच्या भविष्याशीही यांना काही देणेघेणे नाही. देशात अराजकता माजवून चोरट्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा हा एक सुनियोजित कट आहे.”




