गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये संस्थापक दिन उत्साहात साजरा
“वाचन, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे”; अध्यक्ष श्री. विनायकराव भोंगाळे

मोशी | स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीने संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. विनायकराव भोंगाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थापक दिन (फाउंडर्स डे) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव, संस्थापकांच्या दूरदृष्टीचा सन्मान आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प अशा त्रिसूत्री भावनेतून हा सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला संस्थेअंतर्गत दिघी, मोशी आणि चऱ्होली येथील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या विविध शाखांतील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित सहभागामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. संस्थापक दिनाचे औचित्य साधून संगीत व कला विभागाच्या वतीने आकर्षक कलाविष्कार सादर करण्यात आले. विविध शाखांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासाचा आढावा घेतला. संस्थेच्या उभारणीसाठी अध्यक्ष श्री. विनायकराव भोंगाळे यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची दूरदृष्टी, शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी आणि समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले कार्य यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा नगरसेविका मा. सौ.कविता भोंगाळे पाटील होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत, विपणन अधिकारी श्री. शैलेंद्र सिंग, शैक्षणिक संचालिका श्रीमती संगीता गजभारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात अध्यक्ष श्री. विनायकराव भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पालकांच्या अपेक्षा आणि सामाजिक जबाबदारी यांवर विशेष भर दिला. “आजचे विद्यार्थी हे उद्याच्या राष्ट्राचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश मिळवून देणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून, त्यांच्यामध्ये विचारशक्ती, आत्मविश्वास, मूल्यांची जाणीव आणि समाजाप्रती जबाबदारी निर्माण करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे,” असा विचार त्यांनी मांडला.
हेही वाचा
रवींद्र जडेजाची बॅट तळपली! रणजीच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध शतकी खेळी
दैनंदिन जीवनातील वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन केले. बदलत्या काळात नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक घडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नवकल्पना, कौशल्यविकास आणि उद्योजकतेची मानसिकता अंगीकारून स्वावलंबी बनावे, असेही त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांमुळे भविष्यात शिक्षण, उद्योग आणि रोजगार क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता न राहता त्याचा सर्जनशील, जबाबदार आणि समाजोपयोगी उपयोग करणारा नागरिक बनावे, असा संदेश त्यांनी दिला.
“वाचनातून ज्ञान, ज्ञानातून कौशल्य, कौशल्यातून उद्योजकता आणि उद्योजकतेतून राष्ट्राची प्रगती साधली जाते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मात्र ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा यांची जोड द्यावी,” हा त्यांच्या विचारांचा मध्यवर्ती संदेश उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजविकासाचा संकल्प
संस्थापक दिन हा केवळ एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव नसून संस्थेच्या ध्येयधोरणांचे पुनर्स्मरण करण्याचा आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा देण्याचा दिवस असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोन, शिक्षकांचे योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर संस्थेने केलेल्या वाटचालीचा गौरव करत भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याचा निर्धार यावेळी अधोरेखित झाला.
कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली. संस्थापक दिनाच्या निमित्ताने व्यक्त झालेला वाचनसंस्कृती, उद्योजकता, तंत्रज्ञानाचा विवेकी वापर आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.




