रवींद्र जडेजाची बॅट तळपली! रणजीच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध शतकी खेळी

Ravindra Jadeja | भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे. सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात खेळल्या जात असलेल्या ‘एलिट गट ब’ सामन्यात जडेजाने अप्रतिम शतकी खेळी साकारत आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. जडेजाचे शतक आणि प्रेरक मंकडसोबतच्या त्याच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर सौराष्ट्रने पहिल्या डावात सर्वबाद ३९२ धावांची मजबूत मजल मारली.
प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रकडून रवींद्र जडेजाने अत्यंत संयमी व जबाबदार फलंदाजी केली. त्याने २०९ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या मदतीने १०२ धावांची शतकी खेळी उभारली. हे त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील १६ वे शतक ठरले. जडेजा बाद होताच सौराष्ट्रचा पहिला डाव संपुष्टात आला. त्याला छत्तीसगडच्या धर्मेंद्रसिंह जडेजाने बाद केले.
हेही वाचा
“अनेक वर्षे लागली तरी मागे हटणार नाही”; राहुल गांधींचा केंद्र सरकारला थेट इशारा
जडेजाव्यतिरिक्त मधल्या फळीतील फलंदाज प्रेरक मंकड यानेही शानदार शतक झळकावले. मंकडने १५० चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १२९ धावांची आक्रमक खेळी केली.
जडेजा आणि प्रेरक मंकड यांनी पाचव्या विकेटसाठी २९७ चेंडूंमध्ये २०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सौराष्ट्रसाठी या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली असून याच भागीदारीमुळे संघाला ३९२ धावांचा टप्पा गाठता आला.
देव आदित्य सिंगचे ५ बळी; छत्तीसगडची चोख लढत:
छत्तीसगडकडून गोलंदाजीत देव आदित्य सिंगने चमकदार कामगिरी करत २४ षटकांत ६७ धावा देऊन ५ बळी टिपले. त्याला रुद्र प्रताप आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी, तर संदीप वॉरियरने १ बळी घेत चांगली साथ दिली. आता सौराष्ट्रच्या या आव्हानाला छत्तीसगडचा संघ कसा प्रत्युत्तर देतो आणि गोलंदाजीत रवींद्र जडेजा किती कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




