TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनलचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

‘ब’ वर्ग गटातून सोरटेंना ९२ मते; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांसाठी पहिली मोठी निवडणूक, बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

बारामती : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने विजयाचे खाते उघडले आहे. त्यांच्या पॅनलचे उमेदवार संग्राम सोरटे हे ‘ब’ वर्ग गटातून विजयी झाले आहेत. सोरटे यांना १३१ पैकी ९२ मते मिळाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची ही पहिली मोठी निवडणूक असल्याने या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या २१ संचालकपदांसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला यश मिळावे, यासाठी खासदार पार्थ पवार यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी २१ पैकी २१ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे मतमोजणीतील सुरुवातीच्या निकालांनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

२१ पैकी २१ जागा जिंकण्याचा निर्धार

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. ‘२१-० असा निकाल लागेल, अशी शक्यता असून आमची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. विजयाची वाटचाल सुकर होत चालली आहे,’ असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. आता सुरुवातीच्या निकालांमध्ये त्यांच्या पॅनलने खाते उघडल्याने उर्वरित जागांचे निकाल काय लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –  सीजेपी आंदोलनानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; शिवतीर्थावर मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक

पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलसमोर आव्हान

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचे कारखान्यावर वर्चस्व राहिले आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत संजय जगताप यांच्या मदतीने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली.

पहिल्या निकालात सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने विजय मिळवल्याने पुढील निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा असून, सोमेश्वर कारखान्यावर कोणत्या पॅनलचे वर्चस्व राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कामगिरी आणि पार्थ पवार यांनी व्यक्त केलेला २१-० विजयाचा विश्वास प्रत्यक्ष निकालात कितपत उतरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button