“अनेक वर्षे लागली तरी मागे हटणार नाही”; राहुल गांधींचा केंद्र सरकारला थेट इशारा

नवी दिल्ली | ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित गैरकारभारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी थेट भेटीस नकार दिल्यानंतर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार आज दुपारी दीड वाजता इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते सर्वोच्च न्यायालयात जाऊन एकत्रित याचिका दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला ठणकावले असून, “हा लढा लोकशाही वाचवण्यासाठी आहे; कितीही वर्षे लागली तरी आम्ही मागे हटणार नाही,” असा सज्जड इशारा दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “पहिल्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगावर अत्यंत शांततेने मोर्चा काढला, मात्र तिथे आम्हाला धक्काबुक्की करून अडवण्यात आले. आंदोलनासाठी पर्यायी जागा मागितली असता पोलीस अधिकाऱ्याने चक्क ‘घरात आंदोलन करा’ असा अजब सल्ला दिला. हक्काचे आंदोलनस्थळ असलेल्या जंतर-मंतरवर आंदोलकांवर हल्ले झाले आणि राजघाटावर शांततेत बसलेल्या विद्यार्थ्यांनाही मारहाण करण्यात आली. आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडवण्यात आल्यामुळेच अखेर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा
“हिंमत असेल तर पूर्ण व्हिडीओ दाखवा!”; अभिजीत दिपकेंचे दिल्ली पोलिसांना थेट आव्हान
🔵 पहले दिन INDIA गठबंधन के नेता चुनाव आयोग जा रहे थे, हमें रोका गया और बस में डाल दिया।
🔵 दूसरे दिन हम जंतर मंतर जा रहे थे, वहां भी हमें रोक दिया गया और हमारे साथ धक्का-मुक्की हुई
🔵 तीसरे दिन विपक्ष के सारे नेता राजघाट गए
आज हम सुप्रीम कोर्ट जा रहे हैं।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
📍 दिल्ली
— Congress (@INCIndia) October 12, 2026
सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करण्याची घोषणा करत ते म्हणाले, “देशातील कोट्यवधी तरुणांना देशाची लोकशाही आणि मतदानाचा हक्क वाचवायचा आहे. हे एका दिवसाचे आंदोलन नसून दीर्घकालीन संघर्ष आहे. आंदोलकांवर लाठीमार करून आणि अत्याचार करून आता पोलीसही थकत आहेत. ‘आपण ज्ञानेश कुमारांना का वाचवत आहोत?’ हा प्रश्न आता स्वतः पोलिसांनाही पडू लागला आहे. त्यामुळे एक-दोन महिने नव्हे तर वर्षानुवर्षे लढावे लागले तरी आम्ही थकणार नाही आणि हटणार नाही, कारण विजय सत्याचाच होणार आहे.”
राहुल गांधींनी देशभरातील नागरिकांना आणि तरुणांना दुपारी दीड वाजता सर्वोच्च न्यायालयाबाहेर एकत्र येण्याचे तसेच ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांनी जिथे आहेत तिथूनच या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.




