Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

वयाच्या ४२ व्या वर्षी ‘मिस्टर ३६०’ चे वादळ! एबी डिव्हिलियर्सचे अवघ्या ३७ चेंडूंत वादळी शतक

AB de Villiers | ‘वय हा केवळ एक आकडा असतो’ हे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या अफाट आणि ‘३६० डिग्री’ फलंदाजीसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलियर्सने शारजाहमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स’ स्पर्धेत अवघ्या ३७ चेंडूंत झंझावाती शतक ठोकत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचे २१० धावांचे मोठे आव्हान अवघ्या १५.४ षटकांत लिलया पार केले.

सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या तीन चेंडूंत खातेही न उघडणाऱ्या डिव्हिलियर्सने सातव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून आपल्या आक्रमणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज बेन लॉफलिन आणि केन रिचर्डसन यांच्यासह फिरकीपटू फवाद अहमदच्या गोलंदाजीची त्याने अक्षरशः पिसे काढली. अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने पुढील ५० धावा केवळ १४ चेंडूंत कुटल्या. अखेर बेन हिल्फेनहॉसच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत त्याने ३७ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा

“डियर प्राइम मिनिस्टर अंबानी!”; ‘स्टारलिंक’च्या मुद्द्यावरून एलॉन मस्क यांचा थेट मुकेश अंबानींवर निशाणा

स्पर्धेत ७ डावांत ३ शतके; डिव्हिलियर्सचा अभूतपूर्व फॉर्म

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून बराच काळ लोटला असला, तरी एबीची फलंदाजीची धार तिळमात्रही कमी झालेली नाही. या स्पर्धेतील गेल्या सात डावांमध्ये त्याने तब्बल तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. केवळ एका डावातील ६ धावांची खेळी वगळता प्रत्येक सामन्यात त्याने गोलंदाजांवर एकहाती वर्चस्व गाजवले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षीही त्याचा हाच दरारा पाहून जगभरातील क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button