Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

विधान परिषद निवडणुकीत आज माघारीचा शेवटचा दिवस; पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे सेनेच्या भूमिकेकडे लक्ष

पाच मतदारसंघांत ३६५ अर्जांपैकी ११० अर्ज बाद; महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांची मनधरणी, माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई : विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज, शुक्रवार, शेवटची मुदत आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघांतील अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अधिकृत उमेदवार दिल्याने शिंदे गट माघार घेणार की भाजपविरोधात मैत्रीपूर्ण लढत देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर, तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे चित्र आहे. दोन्ही बाजूंच्या घटक पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना कितपत यश मिळाले, हे उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर स्पष्ट होईल.

११० उमेदवारांचे अर्ज बाद

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी एकूण ३६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीत ११० उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मतदारसंघनिहाय वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

नागपूर पदवीधर : ५४

औरंगाबाद पदवीधर : ५४

पुणे पदवीधर : ६९

अमरावती शिक्षक : ३०

पुणे शिक्षक : ४८

आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होईल.

हेही वाचा –  महाखनिज २.०ला सर्व परवानग्या आणि संगणकीय प्रणाली जोडणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे तातडीने संलग्नीकरणाचे निर्देश

पुणे पदवीधरमध्ये सर्वाधिक मतदार

या निवडणुकीसाठी पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ३१ हजार ९६० मतदारांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात ३ लाख २७ हजार ९६१, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात २ लाख ५७ हजार ३४ मतदार आहेत.

शिक्षक मतदारसंघांमध्ये पुणे येथे ६३ हजार ७८९, तर अमरावती येथे ३५ हजार ८१० मतदारांची नोंद झाली आहे.

मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे

पुणे पदवीधर : ७४१

नागपूर पदवीधर : ४४५

औरंगाबाद पदवीधर : ८४२

पुणे शिक्षक : ३१०

अमरावती शिक्षक : ८१

आजच्या माघारीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप, बंडखोरी आणि संभाव्य मैत्रीपूर्ण लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघांतील निवडणूक लढतींकडे राजकीय पक्षांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group