जनसेवेच्या नव्या पर्वाला प्रारंभ! डॉ. सुहास कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
महापौर रवी लांडगे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

भोसरी | प्रतिनिधी : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी, सर्वसामान्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेवक डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. इंद्रायणीनगर, भोसरी येथील ‘अन्नपूर्णा’ इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांसाठी लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याचे एक महत्त्वपूर्ण केंद्र उपलब्ध झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्यात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

सुशिक्षित आणि प्रोफेशनल व्यक्तींनी राजकारणात यावे : आमदार महेश लांडगे
यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना आमदार महेश लांडगे यांनी डॉ. सुहास कांबळे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “सुशिक्षित आणि सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात येणे ही काळाची गरज आहे. अशा व्यक्तींमुळे नागरिकांच्या समस्या अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने समजून घेऊन त्या सोडविण्यास मदत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरसेवक डॉ. सुहास कांबळे. त्यांनी लोकसेवेच्या उद्देशाने सुरू केलेले हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे अधिक सोपे होणार असून, त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.”
जनतेच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय २४×७ उपलब्ध राहणार : डॉ. सुहास कांबळे
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक डॉ. सुहास कांबळे म्हणाले, “हे जनसंपर्क कार्यालय सर्व नागरिकांसाठी २४×७ सदैव उपलब्ध राहणार आहे. नागरिकांची कोणतीही अडीअडचण असो, त्यावर मार्ग काढण्यासाठी आणि ती सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा या कार्यालयाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जनतेचा विश्वास आणि सहकार्याच्या बळावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
हेही वाचा – मतदार यादीतून नाव वगळले गेले तरी चिंता नको! निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोंदणीची संधी

राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, नगरसेवक योगेश लांडगे, नगरसेवक प्रविण भालेकर, प्रतापराव मोहिते मामा, निलम लांडगे, शिवराज लांडगे, संदिपान झोंबाडे, अशोक आहेर, अनिल सौंदाडे, प्रमोद राणे, संतोष निर्सगंध, चंद्रकांत रासकर, अजहर खान, प्रा. बी. बी. शिंदे, भाऊसाहेब डोळस, गोकुळ गायकवाड, विनोद अहिरे, प्रा. संजीव सूर्यवंशी, डॉ. अनू गायकवाड, डॉ. विश्वजीत गायकवाड, नितीन भोसले, प्रशांत लांडगे, कुंदन काळे, सागर भोसले, महादेव गोमे, अशोक सज्जनशेट्टी, संतोष वरे, संदिप लोखंडे, साई वाघमारे, हरीष शिंदे, बाबुराव लोंढे, संदिप कुंभार, पंकज पवार, ॲड. अतुल कांबळे आणि बाबाजी कळमकर यांच्यासह प्रभाग क्रमांक ८ मधील विविध सेक्टरमधील सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व सभासद तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ
जनसंपर्क कार्यालय हे केवळ लोकप्रतिनिधींचे कार्यालय न राहता नागरिकांच्या अडचणी, समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडण्याचे प्रभावी केंद्र व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
विकासाच्या संकल्पाला जनसहभागाची जोड
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. जनतेचा विश्वास हीच लोकप्रतिनिधींची खरी ताकद असून, त्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून न्याय देण्याचा निर्धार या प्रसंगी अधोरेखित झाला.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये जनसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी केले, तर भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय आण्णा चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन उज्ज्वला कांबळे, डॉ. राज कांबळे, डॉ. समृद्धी कांबळे, डॉ. रावसाहेब पोटे, संदिप लोखंडे, अशोक मोरे आणि गिरीश वाघमारे यांनी केले.




