नंदुरबारमध्ये संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला प्राधान्य; पालकमंत्री हसन मुश्रीफांचे प्रशासनाला निर्देश
भूजल पातळी वाढविणारी कामे युद्धपातळीवर राबवा; टँकर, पाणीसाठे आणि जलस्रोतांचे आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. भूजल पातळी वाढविणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन टँकर, पाणीसाठे आणि उपलब्ध जलस्रोतांचे व्यवस्थापन करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलजीवन मिशनची कामे, शेतीची स्थिती, पीक पंचनामे, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कर्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६०.४० मि.मी. असून, यंदा आतापर्यंत ४२४.१० मि.मी., म्हणजेच सरासरीच्या ४९ टक्के पाऊस झाला आहे. अक्राणी तालुक्यात ३९.७० टक्के, तळोदा तालुक्यात ४०.६० टक्के आणि नंदुरबार तालुक्यात ४१.४० टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थिती असलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले.
जिल्हा नियोजन विकास निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जलव्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या कामांना विशेष प्राधान्य द्यावे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व स्तरांवर समन्वयाने काम करावे. शेतकरी आणि मजुरांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक मदत तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत आणि भूजल पातळी झपाट्याने कमी होत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करण्याबरोबरच छोटे टँकर खरेदी करण्याबाबतही नियोजन करावे. अनधिकृत पाणीउपशावर कठोर निर्बंध घालून उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळाचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना आवश्यक पाणी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेसा चारा आणि वैरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनिहाय मोठ्या प्रमाणावर रोजगाराची कामे उपलब्ध करून द्यावीत. रोजगार हमी योजनेतून भूजल पातळी वाढविणारी जलसंधारणाची कामे, जलसाठे निर्माण करणारी कामे हाती घेऊन अधिकाधिक मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले.





