नाशिकच्या क्रीडा विश्वाला नवी झेप; राष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान आणि अत्याधुनिक फ्लडलाइट्सला मंजुरी
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून क्रीडा सुविधांना बळ; फुटबॉल, क्रिकेटपटूंना शहरातच दर्जेदार सरावाची संधी

नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना देणारा निर्णय जिल्हा नियोजन समितीअंतर्गत घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून शहरात राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यास तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्स उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नाशिकने गेल्या काही वर्षांत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळाडू घडविले आहेत. मात्र, उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांसाठी खेळाडूंना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. आता शहरातच अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक खेळाडूंना सरावासाठी मोठी मदत मिळणार आहे.
राष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान
नवीन फुटबॉल मैदानात उच्च दर्जाचे लॉन, योग्य ड्रेनेज सिस्टिम, पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आणि मानक आकारानुसार आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना नियमित आणि दर्जेदार सरावासाठी उत्तम मैदान उपलब्ध होईल. चांगल्या मैदानामुळे खेळताना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल.
या सुविधेमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धांसह व्यावसायिक लीगचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
क्रिकेटपटूंना रात्रीच्या सरावाची सुविधा
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्समुळे क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करता येणार आहे. नोकरी, शाळा आणि महाविद्यालय सांभाळणाऱ्या खेळाडूंनाही सायंकाळनंतर सरावासाठी मैदान उपलब्ध होईल.
या सुविधेमुळे नाशिकमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
‘स्पोर्ट्स हब’ म्हणून नाशिकला ओळख
उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नाशिकमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाहेरील शहरांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी नाशिकमध्ये येतील. याचा सकारात्मक परिणाम पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्रावर होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दर्जेदार मैदानांवर सरावाची संधी मिळाल्याने नाशिकच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि खेळातील गती विकसित होण्यास मदत होईल. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील विविध संघांमध्ये नाशिकच्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्यात आल्याने नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे क्रीडा संघटना आणि प्रशिक्षकांनी सांगितले. नाशिकमध्ये गुणवत्तेची कमतरता नसून अद्ययावत सुविधा आणि योग्य व्यासपीठाची गरज होती. या सुविधांमुळे नाशिकची ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी व्यक्त केला.




