‘संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या!’ उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित
२० ऑक्टोबरला शिवतीर्थावर दसरा मेळावा; ‘शिवसेना हा पक्ष नाही, विचार आहे’ म्हणत शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली असून, या मेळाव्याचा पहिला व्हिडिओ टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या’, असे आवाहन या टीझरमधून राज्यभरातील शिवसैनिकांना करण्यात आले आहे. हा मेळावा २० ऑक्टोबर रोजी दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावर होणार आहे.
‘शिवसेना हा पक्ष नाही, विचार आहे’
दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांची विविध भाषणे दाखवण्यात आली आहेत. ‘शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे’, ‘निष्ठा हीच आमची ओळख आहे’ आणि प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, अशा आशयाची विधाने या टीझरमध्ये समाविष्ट आहेत.
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीतील ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…’ या संबोधनाची झलकही दाखवण्यात आली आहे. या माध्यमातून शिवसेनेची वैचारिक भूमिका आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा – टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पोस्ट व्हायरल, अभिनेता सुरक्षित
संविधान रक्षणाचा संदेश; शिवसैनिकांना आवाहन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविरोधातील (SIR) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनाही विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. अशा परिस्थितीत दसरा मेळाव्याच्या टीझरमधून संविधान रक्षणाचा संदेश देण्यात आल्याने या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टीझरच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांना शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे कोणावर साधणार निशाणा?
राज्यातील बदलते राजकीय समीकरण, निवडणूक प्रक्रिया, संविधान आणि विरोधकांचे आंदोलन या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष असेल. सत्ताधाऱ्यांवर ते कोणत्या मुद्द्यांवरून टीका करतात आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत काय संकेत देतात, हे मेळाव्यानंतर स्पष्ट होईल.
२० ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात आणि राज्याच्या राजकारणात कोणते मुद्दे केंद्रस्थानी आणतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.




