मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये मराठी ज्ञानसामग्री वाढविण्यावर भर; ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा उत्साहात शुभारंभ

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी फडणवीस बोलत होते. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.
आधुनिक ज्ञाननिर्मितीत मराठीचा वापर
मराठीला अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळणे हा मराठी भाषकांसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठीतील समृद्ध शब्दसंपदा आणि ज्ञानपरंपरेचा उपयोग आधुनिक ज्ञाननिर्मितीसाठी झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठीचा ज्ञानभाषा म्हणून वापर अधिक व्यापक होईल, असे त्यांनी नमूद केले.
मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये लाखो शब्द नोंदविले गेले असून, राज्य शासनाच्या मराठी शब्दकोशाच्या पुढील आवृत्त्यांमधून ही शब्दसंपदा आणखी विस्तारित करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.
‘मराठी AI’मधून नव्या युगाशी जोडणी
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा वापर वाढविण्याची गरज आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, ओटीटी आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी ज्ञानसामग्री व कंटेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला पाहिजे. क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रांतील ज्ञान मराठीत उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी आणि झाडीबोली यांसारख्या महाराष्ट्रातील विविध बोलीभाषाही मराठीचा अमूल्य ठेवा आहेत. या बोलींमधील साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्यांचे जतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
हेही वाचा – हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के; प्रशासन सतर्क
जगभरातील मराठी बांधवांशी जोडणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीचा जागतिक पातळीवर विस्तार करण्याच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लंडनमध्ये मोठ्या संख्येने मराठी बांधव वास्तव्यास असून, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मराठी शिक्षण, अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र परीक्षांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी वाढदिवस किंवा सत्काराच्या प्रसंगी पुष्पगुच्छाऐवजी मराठी पुस्तके भेट देण्याची संस्कृती रुजवावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
अभिजात मराठीच्या संशोधनाला संस्थात्मक बळ
मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’, लंडनमध्ये वैश्विक मराठी केंद्र, विविध बोलीभाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी ‘मराठी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय मराठी मंचांची संख्या सध्या ५२ असून ती ७५ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सामंत यांनी नमूद केले. साहित्यिकांच्या मागणीनुसार ‘साहित्य संग्रहालय’ आणि अत्याधुनिक ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ऐरोली उपकेंद्र, ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘कवितेचे गाव’ यांसारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, अभिजात मराठी भाषा अध्ययन आणि संशोधनासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे.
विश्वकोशाचे काम डिजिटल स्वरूपात
मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी मराठीच्या सुमारे अडीच हजार वर्षांच्या भाषिक परंपरेचा उल्लेख केला. अभिजात मराठीच्या संशोधनासोबत तिची ज्ञानसंपदा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विश्वकोश निर्मितीच्या कार्याला आता डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, विश्वकोशातील ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ‘मराठीचे कौतुक भाग–२’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.




