सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला AI ची जोड; ४०० शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प
हवामान बदलाच्या आव्हानांवर तंत्रज्ञानातून उपाय; आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प, AI, IoT, मृदा सेन्सर्स आणि उपग्रह छायाचित्रांचा वापर

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू फळपिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासह शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेतीकडे नेण्यासाठी आंबा-काजू उत्पादकांसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम सिंधुदुर्गच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून दोन वर्षांचा हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे.
AIच्या माध्यमातून पिकांचे व्यवस्थापन
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि शासनाच्या माध्यमातून विविध शाश्वत उपाययोजना सुरू आहेत. त्यासोबतच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसमोरील आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील विविध देशांमध्ये शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असून, सिंधुदुर्गातील शेतकरीही या तंत्रज्ञानापासून दूर राहणार नाहीत, यासाठी जिल्ह्यात शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. पुढील पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी AI आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावरही भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४.५० लाख रुपयांचा टप्पा पार करण्यासाठी विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविण्यात येतील. हा प्रकल्प पारदर्शकपणे राबवून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राणे यांनी सांगितले.
हेही वाचा – मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
हवामानापासून मातीपर्यंत माहितीचे विश्लेषण
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली. उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतीच्या सनियंत्रणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग करता येतो. ऊस उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबा आणि काजू पिकांशी संबंधित विविध माहिती एकत्रित करून AI प्रणालीच्या माध्यमातून तिचे विश्लेषण केले जाणार आहे. त्याआधारे पिकांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. कृषक मोबाईल प्रणालीच्या माध्यमातून हे मार्गदर्शन मराठी भाषेत आणि शेतकऱ्यांना सहज समजेल अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
IoT, सेन्सर्स आणि उपग्रह छायाचित्रांचा वापर
प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT तंत्रज्ञान, उपग्रह छायाचित्रे, AI आधारित पीक निरीक्षण आणि डिजिटल मॅपिंगचा वापर केला जाणार आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे डिजिटल वॉर रूम उभारण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी आणि मान्यवर उपस्थित होते.




