पहिल्यांदाच गोल्फमध्ये ‘गोल्ड’! प्रणवी उर्सची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

Asian Games 2026 | आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी भारतीय महिला खेळाडूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. अमरावतीच्या १७ वर्षीय कुमकुम मोहोडने तिरंदाजीत मिळवलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर स्टार गोल्फर प्रणवी शरथ उर्स हिने गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फ प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी प्रणवी ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. वैयक्तिक सुवर्णासह तिने भारतीय संघाला सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवून देण्यातही मोलाचे योगदान दिले.
प्रणवीने वैयक्तिक प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक हे भारताचे या स्पर्धेतील ७८ वे, तर गोल्फ सांघिक प्रकारातील रौप्यपदक हे ७९ वे पदक ठरले. भारताच्या खात्यात आता १८ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३५ कांस्य अशी एकूण ७९ पदके जमा झाली असून, भारत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा
माईर्स एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा ‘एज्युस्किल्स कनेक्ट समिट २०२६’ मध्ये गौरव
भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वीच श्रीलंकेला नमवून सुवर्णपदक पटकावले आहे. आता पुरुष क्रिकेट संघही अंतिम फेरीत दाखल झाला असून, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून क्रिकेटमधील आणखी एक सुवर्णपदक खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. शुक्रवारी भारताने एकाच दिवशी बॉक्सिंगमधील हॅटट्रिकसह ६ सुवर्णपदके जिंकली होती; तर महिला हॉकी संघाने यजमान चीनला नमवून ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले होते.
गुणतालिकेतील स्थिती
पदकतालिकेत चीन १६२ सुवर्ण, ८१ रौप्य आणि ७४ कांस्य अशा तब्बल ३१७ पदकांसह अव्वल स्थानी आहे. जपान ७२ सुवर्णांसह दुसऱ्या, दक्षिण कोरिया ३३ सुवर्णांसह तिसऱ्या, तर उझबेकिस्तान २० सुवर्णपदकांसह चौथ्या स्थानी आहे. १८ सुवर्णांसह पाचव्या स्थानी असलेला भारत लवकरच चौथे स्थान गाठण्याच्या प्रयत्नात आहे.





