महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट; राज्य शासनाचा निर्णय
सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; अतुल सावेंच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पाठपुराव्यामुळे या उपक्रमाला गती मिळाली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासाठी ५५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या राष्ट्रीय योगदानाचे स्मरण व्हावे, या उद्देशाने द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त हे विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा
महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि रूढींविरोधात संघर्ष करत सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांचा पुरस्कार केला. स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने केलेले कार्य भारतीय सामाजिक सुधारणांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या विचारांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला व्यापक दिशा दिली.
हेही वाचा – धुळ्यात ३,२५८ शेतकऱ्यांना ३३ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; जयकुमार रावल यांची माहिती
राष्ट्रीय योगदानाचे स्मरण
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय योगदानाचे स्मरण व्यापक स्तरावर होणार आहे. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे शासनाकडून नमूद करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रक्रिया पुढे सरकल्याचे सांगण्यात आले असून, सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्याच्या कामाला आता औपचारिक गती मिळाली आहे.





