Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

धुळ्यात ३,२५८ शेतकऱ्यांना ३३ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; जयकुमार रावल यांची माहिती

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’चा तिसरा टप्पा; राज्यात आतापर्यंत १५.८५ लाख कर्जखात्यांवर १३,२७५ कोटींचा लाभ

धुळे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत लाभ वितरणाच्या तिसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील ३,२५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ३३ कोटी १ लाख रुपयांचा लाभ वर्ग करण्यात आला आहे. कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देऊन आगामी पीक हंगामासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. त्याच दिवशी शासन निर्णयाद्वारे योजना जाहीर करण्यात आली, तर १५ जुलै २०२६ रोजी काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली. कर्जमुक्ती आणि एकरकमी तडजोड या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे.

१५.८५ लाख कर्जखात्यांवर १३,२७५ कोटींचा लाभ

राज्यभरातील सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे २०.१५ लाख शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर १७.२१ लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ वितरित करण्यात येत आहे. यापूर्वी सुमारे १२.५८ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर १०,११५ कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले होते. तिसऱ्या टप्प्यात आणखी ३ लाख २७ हजार २५० कर्जखात्यांवर ३,१६०.४४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.

त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ४९३ कर्जखात्यांवर १३,२७५.४५ कोटी रुपयांचा लाभ वितरित झाला आहे.

हेही वाचा –  सणासुदीआधी भेसळखोरांवर FDAचा दणका; ३,९०२ किलो अन्नपदार्थ, ६१७ लिटर दूध जप्त

नाशिक विभागाला २,१७४ कोटींचा लाभ

नाशिक विभागातील सुमारे २.४८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर २,१७४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे जिल्ह्यातील ३,२५८ शेतकऱ्यांना ३३.०१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातूनही योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ३,५९६ कर्जखात्यांना ३२.१४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १,५९५ कर्जखात्यांना १४.२१ कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात २०३ कर्जखात्यांना १.७९ कोटी रुपये, असा एकूण ५,३९४ कर्जखात्यांना ४८.१३ कोटी रुपयांचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

व्यापारी आणि जिल्हा बँकांमार्फत मोठा लाभ

राज्यस्तरीय तिसऱ्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत ४१,३३१ कर्जखात्यांना २९५.२७ कोटी रुपये, तर व्यापारी बँकांमार्फत २ लाख ८५ हजार ९१९ कर्जखात्यांना २,८६५.१७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्यात एकूण ३ लाख २७ हजार २५० कर्जखात्यांवर ३,१६०.४४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले.

कर्जमुक्तीचा लाभ केवळ जुन्या कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नसून, त्यांना आगामी हंगामासाठी पुन्हा आर्थिक बळ मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवे पीक कर्ज

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आवश्यक आर्थिक नियोजन करणे सुलभ होणार आहे.

दरम्यान, पात्र यादीत नाव असूनही अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषांनुसार पात्र लाभाची रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे.

धुळे जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी केवळ आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button