सातपूर-अंबड एमआयडीसीतील रस्त्यांना गती; डीपीआर तयार करून कामे मार्गी लावण्याचे उदय सामंतांचे निर्देश
महापालिकेकडे हस्तांतरित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; पाणीपुरवठा, अग्निशमन, IT Park, सांडपाणी प्रक्रिया आणि ट्रक टर्मिनसचाही आढावा

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील सातपूर आणि अंबड एमआयडीसी क्षेत्रातील महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांची कामे नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावीत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) मालकीच्या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, अग्निशमन सुविधा, IT Park, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि ट्रक टर्मिनस यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हस्तांतरित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
नाशिक शहरालगत अंबड, चुंचाळे आणि पाथर्डी येथे ५१५.५० हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त नाशिक (अंबड) औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील रस्ते आणि पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ते टप्प्याटप्प्याने नाशिक महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड आणि सातपूर एमआयडीसी परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हस्तांतरित रस्त्यांची कामे संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
हेही वाचा – रायगडला मिळणार पहिले ‘Star Gazing Centre’; मारळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा
MIDCच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र DPR
MIDCच्या मालकीच्या रस्त्यांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती व विकासकामे आणि त्यासाठी लागणारा अंदाजित खर्च यांचा समावेश असलेला DPR तयार करून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रस्ते विकासाचे नियोजन अधिक सुसूत्रपणे करता येणार आहे.
पाणी, अग्निशमन आणि IT Parkचाही आढावा
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दिंडोरी येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी सर्वेक्षण, IT Parkच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी आणि ट्रक टर्मिनस विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
बैठकीस विधान परिषदेचे सदस्य गोकुळ गिते, नरेंद्र दराडे, माजी आमदार किशोर दराडे, MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्तालयाच्या सहआयुक्त मृणालिनी देवराज, अभियंता राहुल बनसोड आदी उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या.




