रायगडला मिळणार पहिले ‘Star Gazing Centre’; मारळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा
हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि सुशोभीकरण; समुद्रकिनारा, धार्मिक वारसा व निसर्ग पर्यटनाची सांगड घालण्यावर आदिती तटकरेंचा भर

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पहिले प्रगत खगोल निरीक्षण केंद्र (Star Gazing Centre) मारळ येथे उभारण्यात येणार आहे. यामुळे रायगडच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्यास मदत होणार असून, मारळचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि सुशोभीकरण करताना प्रस्तावित पायाभूत सुविधांची नव्याने निश्चिती करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
भारत स्वदेश अंतर्गत हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि मारळ येथील Star Gazing Centre यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी पर्यटन संचालनालयाचे अधिकारी, उपअभियंता सोनिया महिंद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मारळचा एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकास
आदिती तटकरे म्हणाल्या की, मारळचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समुद्रकिनारा, धार्मिक वारसा, निसर्ग, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांची सांगड घालून मारळचा एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा प्रयत्न आहे.
मारळ परिसरातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर आणि आरावी ही पर्यटनस्थळे विकसित होत आहेत. श्रीवर्धन तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. हरिहरेश्वर हे ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असल्याने या धार्मिक वारशाचा आधार घेत परिसराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यावर भर दिला जात आहे.
हरिहरेश्वरच्या पायाभूत सुविधांची नव्याने आखणी
हरिहरेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची नव्याने निश्चिती करण्याचे निर्देश तटकरेंनी दिले. प्रदक्षिणा मार्गाच्या विकास आणि सुशोभीकरणाचा आराखडा तयार करताना भाविकांसह पर्यटकांच्या गरजा लक्षात घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
Star Gazing Centre साठी प्रादेशिक पाहणी
मारळ येथे प्रस्तावित खगोल निरीक्षण केंद्रासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रादेशिक पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रासाठी आवश्यक सुविधा, जागेची उपयुक्तता आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पर्यटन विभागाकडे सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून तो तातडीने सादर करावा, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग आणि खगोल पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





