ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा; राधाकृष्ण विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाची आढावा बैठक; उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणी नियोजनाला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध प्रकल्प आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विखे पाटील म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत बैठकीचा मुख्य फोकस दुष्काळ आणि पाणी नियोजनावर होता. उपलब्ध पाणीसाठ्यातून सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले पाहिजे. ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी कसे उपलब्ध राहील, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उर्वरित पाण्याच्या वापराबाबतही नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पांच्या कामांचा आढावा
जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला. काही प्रकल्प सुरू आहेत, तर काही प्रकल्पांचे काम विविध कारणांमुळे थांबले आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणी आणि आगामी काळातील पाण्याचे नियोजन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
2028 पर्यंत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. प्रत्येक धरणाचे ऑडिट केले जाणार असून, प्रकल्प तयार करण्यात आला त्यावेळची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना केली जाणार आहे. संबंधित प्रकल्पाचा त्या भागावर झालेला परिणाम तसेच त्यातून निर्माण झालेला सामाजिक आणि आर्थिक परिणामही तपासला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ
पाण्याच्या नियोजनासाठी सॅटेलाइट डेटाचा वापर
2026-27 या वर्षातील पाणी नियोजनासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. या डेटाचा उपयोग पुढील नियोजनासाठी केला जाणार आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून हे नियोजन नसून, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन धोरणात्मक पातळीवर ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील मोठ्या प्रकल्पांसोबतच जायकवाडीवरील सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भातही कायदेशीर पूर्तता करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर गरजेचा
उपलब्ध असलेला पाणीसाठा आगामी काळात कशा पद्धतीने वापरता येईल, याचे नियोजन करणे आपल्या हातात आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. या संदर्भातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आठ दिवसांत पाणी नियोजनाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, माणिक इन्फ्राला कोणतीही विशेष वागणूक देऊन काम देण्यात आलेले नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. अनेक कंत्राटदार कामासाठी येतात आणि नियमानुसारच कामांचे वाटप केले जाते, असे त्यांनी सांगितले.




