Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कोल्हापूरला जागतिक नकाशावर नेण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे उपक्रम राबवा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन

निसर्ग, पर्यटन, उद्योग, क्रीडा आणि धार्मिक वारशाची सांगड घालण्यावर भर; विमानतळ कनेक्टिव्हिटी वाढविण्याची गरज

कोल्हापूर : निसर्गसौंदर्य, धार्मिक पर्यटन, क्रीडा, व्यापार, उद्योग, कृषी उत्पादने आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा अशी विविध वैशिष्ट्ये असलेल्या कोल्हापूरचे समग्र आणि एकात्मिक ब्रॅण्डिंग करण्याची गरज आहे. कोल्हापूरची ही वैशिष्ट्ये देशासह जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे उपक्रम नियमितपणे राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, पर्यटन, धार्मिक स्थळे, उद्योग, क्रीडा, शिक्षण, आरोग्य आणि शहर विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचे ब्रॅण्डिंग गरजेचे

राज्यपाल वर्मा म्हणाले की, कोल्हापूरला गौरवशाली परंपरा लाभली आहे. येथील कुस्ती आणि कबड्डीसारख्या क्रीडा प्रकारांना मोठी ओळख आहे. जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि निसर्गसौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करणारे आहे.

इचलकरंजीचा वस्त्रोद्योग आणि हुपरीचा चांदी उद्योग देश-विदेशात पोहोचला आहे. श्री अंबाबाई आणि श्री जोतिबा यांसारखी धार्मिक स्थळे, तसेच कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, विविध कृषी उत्पादने आणि हस्तकला यामुळे कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या सर्व वैशिष्ट्यांची एकत्रित सांगड घालून कोल्हापूरचे ब्रॅण्डिंग करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरला पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने अधिक व्यापक पातळीवर जोडण्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढविणे महत्त्वाचे असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

हेही वाचा –  महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही; बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

‘नशामुक्त भारत’, ‘टीबीमुक्त भारत’ अभियानाला गती

सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी ‘नशामुक्त भारत’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ ही अभियान व्यापकपणे राबविण्याच्या सूचना राज्यपालांनी प्रशासनाला दिल्या.

व्यसनमुक्ती ही केवळ कायदा, पोलीस प्रशासन किंवा शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून नागरिक, कुटुंब आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नशामुक्त पिढी घडविणे हे मोठे आव्हान असून, समाजातूनच व्यसनाला नकार निर्माण झाला पाहिजे. खेळाडू, कलाकार आणि प्रभावी व्यक्तींनी जनजागृती व प्रबोधनासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकास प्रकल्पांचे सादरीकरण

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महामार्ग विकास, रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा व तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, पूर नियंत्रण आणि प्रदूषणमुक्तीसाठीचे प्रकल्प यांची माहिती दिली.

प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार-पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड, चारपदरी उन्नत मार्गिका आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग यांसह विविध प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.

शहर सुशोभीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांचे कौतुक

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाउंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग व भक्तनिवास, कोल्हापूर एलेव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन आणि GIS आधारित मालमत्ता सर्वेक्षण याबाबत माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन यांनी प्राथमिक शिक्षणातील विविध उपक्रम, PGI ग्रेडिंग आणि ‘समृद्ध शाळा-पिंक रूम’ उपक्रमाचे सादरीकरण केले. राज्यपालांनी पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून त्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर रेस्क्यू टीमच्या संकल्पनेचेही राज्यपालांनी कौतुक केले.

या बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, कुलगुरू राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button