Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

रीलस्टार दिव्या शिंदेला अटक! निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर ५ लाखांच्या खंडणीसाठी हल्ला केल्याचा आरोप

पुणे | पुणे कटक मंडळातील (पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड) निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यावर पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दिव्या शिंदेला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या इतर ८ ते १० साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे २०२१ मध्ये पुणे कटक मंडळातून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून ते एका स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहेत. या संस्थेमार्फत १ ते ३ सप्टेंबर दरम्यान ‘कला आविष्कार महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही कार्यक्रमाची प्रसिद्धी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) केल्याचा दावा करत तिने तक्रारदाराशी संपर्क साधून पैशांची मागणी सुरू केली.

हेही वाचा

नागपुरात अतिविशेष दंतचिकित्सा केंद्राचे काम वेगाने; तीन महिन्यांत लोकार्पणाचे फडणवीस यांचे निर्देश

हॉटेलमध्ये धमकावून खंडणीची मागणी

तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे आणि तिचे साथीदार तक्रारदाराच्या घरी गेले. ते घरी नसल्याचे पाहून या टोळक्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पुन्हा संपर्क साधून तक्रारदाराला लष्कर (कॅम्प) भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून घेण्यात आले. तेथे त्यांच्यावर दबाव आणत थेट पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.

घरात घुसून बेदम मारहाण; अखेर अटकेची कारवाई

२४ सप्टेंबर रोजी रात्री तक्रारदार घरी एकटे असताना दिव्या शिंदे आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी तक्रारदाराला बेदम मारहाण करत दहशत माजवली. या प्रकारानंतर तक्रारदाराने तातडीने काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी कारवाई करत दिव्या शिंदेला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button