दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; धुळ्यात पंचनामे, पाणी-चाऱ्याच्या नियोजनाला वेग
फागणे-मुकटी परिसरात पीक नुकसानीची पाहणी; पंचनामे वेगाने पूर्ण करून मदत पोहोचविण्याचे निर्देश, पाणी-चाऱ्याच्या नियोजनावर भर

धुळे : पावसाने तब्बल ४० ते ५० दिवस दडी मारल्याने धुळे तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभी पिके करपली असून अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करून आवश्यक मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे तालुक्यातील फागणे आणि मुकटी परिसरात शेतांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. कपाशी, मका, सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. उत्पादनावर झालेला परिणाम तसेच पुढील काळातील पाणी आणि चाऱ्याच्या संभाव्य समस्यांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
पिकांचे मोठे नुकसान
दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली असल्याचे महाजन यांनी सांगितले. मोठ्या आशेने लागवड केलेली कपाशी, सोयाबीन आणि मक्याची पिके पाण्याअभावी बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नसल्याचे, तर काही भागांत मक्याची पिकेही मोठ्या प्रमाणात वाळल्याचे त्यांनी नमूद केले.
‘शेतातील नुकसान केवळ पिकांचे नुकसान नाही; त्यामागे शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट, कुटुंबाच्या अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्ने जोडलेली आहेत,’ असे सांगत महाजन यांनी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.
हेही वाचा – निफाडच्या दुष्काळी परिस्थितीची फेरपडताळणी; छगन भुजबळांचे प्रशासनाला कडक निर्देश
पंचनामे आणि मदतीला वेग
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. धुळे आणि जळगावसारख्या जिल्ह्यांतील परिस्थितीचा विचार करून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील काळासाठी पाणी-चाऱ्याचे नियोजन
पुढील सात ते आठ महिन्यांचा काळ आव्हानात्मक ठरू शकतो, त्यामुळे आतापासूनच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. धरणे, तलाव आणि उपलब्ध जलस्रोतांतील पाण्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे महाजन यांनी सांगितले.
संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चाऱ्याची उपलब्धता तपासावी तसेच आवश्यकतेनुसार चारा छावण्यांचे नियोजन आतापासूनच करावे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
धुळ्यासाठी कायमस्वरूपी जलसंधारणाचा आराखडा
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यात व्यापक जलसंधारणाची कामे मिशन मोडवर हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान-मोठे बंधारे, जलसाठ्यांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट क्षेत्र विकास, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या कामांना व्यापक स्वरूप देण्याचा आग्रह रावल यांनी धरला.
‘दुष्काळ पडल्यानंतर उपाययोजना करण्यापुरते मर्यादित न राहता भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी कशी करता येईल, प्रत्येक थेंब पाणी जमिनीत कसे मुरेल आणि शेतकऱ्याला वर्षभर पाण्याची शाश्वत उपलब्धता कशी निर्माण करता येईल, याचा विचार आवश्यक आहे,’ असे रावल यांनी सांगितले.
दुष्काळाच्या काळात पाणी, चारा, शेती आणि रोजगार या चारही बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि मदत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचविण्याच्या सूचनाही रावल यांनी केल्या.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पीक उभारणीसाठी केलेला खर्च, कर्जाचा वाढलेला भार आणि आर्थिक अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. महाजन आणि रावल यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेत प्रशासनाला नुकसानीची वस्तुनिष्ठ आणि अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.





