“हा माझा शेवटचा वर्ल्डकप, देशासाठी सर्वस्व पणाला लावणार!”; विराट कोहलीचे २०२७ च्या वर्ल्डकपबाबत मोठे वक्तव्य

Virat Kohli | आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाची बांधणी सुरू असतानाच स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या भविष्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे विधान केले आहे. आगामी वर्ल्डकप हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्डकप असेल, असे संकेत देत देशासाठी पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार विराटने व्यक्त केला आहे. ‘जियोस्टार’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत तो बोलत होता.
मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना विराट म्हणाला, “हा भारतीय संघासाठी माझा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा असेल. या स्पर्धेत मला माझे सर्वस्व पणाला लावायचे आहे. देशासाठी वर्ल्डकप जिंकणे हेच माझे एकमेव लक्ष्य असून त्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व करण्यास मी तयार आहे.” २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा विराट महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर २०१९ आणि २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे जेतेपद अवघ्या काही पावलांवर हुकले होते.
हेही वाचा
आपल्या मानसिकतेतील बदलाविषयी बोलताना विराटने सांगितले, “मी आता अधिक मोकळेपणाने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लोक माझ्याकडून काय अपेक्षा ठेवतात याचा विचार न करता मी मैदानात उतरणार आहे. संघात आता अनेक सक्षम आणि उत्तम खेळाडू आहेत, ज्यांना कठीण परिस्थिती कशी हाताळायची हे ठाऊक आहे. त्यामुळे मला केवळ स्वतःला नैसर्गिकरीत्या व्यक्त करायचे आहे आणि सातत्य राखायचे आहे.”
विराटने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नुकत्याच खेळलेल्या गेल्या १० वनडे सामन्यांमध्ये त्याने तब्बल ६४.६८ च्या सरासरीने १०३५ धावा चोपल्या असून, यात ३ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२७ चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणार आहे. आफ्रिकेतील उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवर विराट कोहलीसारख्या अनुभवी फलंदाजाची उपस्थिती भारतीय संघासाठी अत्यंत मोलाची मानली जात आहे.





