शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा; उदय सामंतांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
दुष्काळग्रस्त तालुक्यांसह संपूर्ण रत्नागिरीत युद्धपातळीवर पंचनामे; उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा

रत्नागिरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठीचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले. पंचनामे करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पीक परिस्थिती आढावा बैठकीत डॉ. सामंत बोलत होते. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे तातडीने युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.
उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी पाठपुरावा
मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने त्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे डॉ. सामंत यांनी सांगितले.
उर्वरित तालुक्यांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तातडीने शासनाकडे सादर करावेत. पावसाचा खंड आणखी वाढल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी काटेकोर पाणी नियोजन आराखडा तयार ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा – राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांसाठी १२ उपाययोजना लागू
थेट बांधावर जाऊन पंचनामे; ॲग्रीस्टॅक नोंदणीला वेग
पंचनाम्यांच्या कामकाजावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देखरेख ठेवावी, असे निर्देश देण्यात आले. पंचनामे करताना शेतकऱ्याचे बँक खाते, आधार तपशील आणि ई-केवायसी अचूक असल्याची खात्री करावी, असेही सांगण्यात आले.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याची ‘ॲग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी पूर्ण होईल, याची दक्षता तलाठी आणि ग्रामसेवकांनी घ्यावी. यासाठी प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले.
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या शेतीचेही पंचनामे पूर्ण करावेत, अशी सूचनाही डॉ. सामंत यांनी केली.
चारा नियोजनासह ‘वनराई बंधारे’ मोहीम
जिल्ह्यात मार्च २०२७ पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. भात कापणीनंतर उपलब्ध होणारा पेंडा खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधीचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना डॉ. सामंत यांनी केली.
जलसंधारणाचा आढावा घेताना जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २३३ गावांत कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील २० मोठ्या धरणांमध्ये सुमारे ८२ टक्के पाणीसाठा असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाभर ‘वनराई बंधारे’ बांधण्याची धडक मोहीम राबवावी आणि पुढील आठवड्यात त्याचा आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंबा आणि काजू पिकांवर दुष्काळाचा होणारा परिणाम तपासून बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
वीजबिलात सवलत, कर्ज पुनर्गठनाचा आढावा
शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांचे प्रकार आणि व्याप्ती निश्चित करून अग्रणी बँकेने कर्ज पुनर्गठनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत लागू असलेल्या सवलतींची अंमलबजावणी तसेच त्यावरील पंपांसाठीही संबंधित सवलतींची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे निकष शिथिल करण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच टँकर अधिग्रहणाचा मोबदला वेळेत देण्यासाठी आवश्यक तरतुदी तपासाव्यात, असे निर्देश देण्यात आले.
दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.





