मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूरमधील जाऊ, खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी; धाराशिवमध्येही शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळी उपाययोजनांबाबत निर्णयाकडे लक्ष

लातूर : मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ आणि औसा तालुक्यातील खरोसा येथे मुख्यमंत्री पाहणी करणार असून, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुष्काळाबाबतची पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी काढण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीही परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
लातूरमध्ये अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पिकांची उत्पादकता घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, शेतमजुरांसमोरही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीचे नियोजनही अडचणीत आले आहे. आडसाली ऊस लागवडीवरही पावसाच्या तुटीचा परिणाम झाला आहे.
पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठे कमी झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. अलीकडील अहवालानुसार मांजरा धरणातील साठा १० टक्क्यांपर्यंत घसरला असून, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्येही अत्यल्प साठा असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – ज्ञानेश कुमार यांच्या बरखास्तीची मागणी; संजय राऊतांचा गंभीर आरोप, जनआंदोलनाचा इशारा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी, जलसंपदा, भूजल, पाणीपुरवठा आणि पशुसंवर्धन विभागांकडून परिस्थितीची माहिती संकलित करण्यात आली आहे. पीक नुकसान, उत्पादकतेतील घट, पीकविमा आणि पाणीटंचाईशी संबंधित आकडेवारीचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार आहे.
दरम्यान, जाऊ गावातील शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले आहे. “सगळी पिके करपून गेली आहेत. आता सरकार जी मदत देईल, तेच आमचे उत्पन्न असेल,” अशी प्रतिक्रिया शेतकरी राजू कोष्टी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणांची अपेक्षा आहे. पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगार आणि आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.




