TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘गोंधळ’ची ऑस्करवारी; मराठी सिनेमाचा पुन्हा जागतिक मंचावर डंका

९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका; दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ‘हा क्षण अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक’

कल्याण : अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली असून, हा चित्रपट ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते संतोष डावखर यांनी हा क्षण महाराष्ट्र आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ यांसह विविध भाषांमधील चित्रपट ऑस्करच्या भारतीय प्रवेशिकेसाठी स्पर्धेत होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ लोककलेला आणि सांस्कृतिक परंपरेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या चित्रपटाची निवड झाली.

‘गोंधळ’ची कथा महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ विधी आणि लोककला परंपरेच्या पार्श्वभूमीवर उलगडते. चित्रपटाला यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल मिळाली आहे. २०२५ मध्ये ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) संतोष डावखर यांना ‘गोंधळ’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा –  मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

“‘गोंधळ’चा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे,” असे डावखर यांनी सांगितले.

चित्रपटाच्या ऑस्कर अभियानासाठी नियोजनबद्ध कृतीआराखडा तयार करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे प्रमोशन केले जाणार आहे. ‘गोंधळ’ पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी असून, भारतासह परदेशातील प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे डावखर यांनी सांगितले.

दरम्यान, ‘गोंधळ’च्या या निवडीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. चित्रपटाच्या ऑस्कर अभियानाला प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा आणि या प्रवासाचा भाग व्हावे, असे आवाहन डावखर यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button