मीराबाई चानूचे स्वप्न अखेर पूर्ण! आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक

Mirabai Chanu | भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या पदकांच्या संग्रहात अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली उणीव अखेर भरून निघाली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली. या यशासह आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे तिचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून, तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
१९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत दिग्गज वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी यांनी भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई पहिली खेळाडू ठरली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक विजेतेपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदके अशी दिमाखदार कामगिरी तिच्या नावावर असताना केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक तिच्या कॅबिनेटमध्ये नव्हते, तेही आता तिने आपल्या नावावर केले आहे.
हेही वाचा
MLA बाबाजी काळे : महायुतीच्या लाटेत खेड-आळंदीचा गड जिंकणारा ठाकरेंचा शिलेदार!
Mirabai Chanu nails all her three Snatch attempts, successfully lifting 83kg, 85kg and 87kg in a perfect start to her Asian Games campaign! 🔥
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames… pic.twitter.com/E1DnrjOhuB
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2026
अपयश आणि दुखापतींवर मात करत ऐतिहासिक भरारी
मीराबाईचा क्रीडा प्रवास सातत्य, प्रचंड जिद्द आणि संयमाचे उत्तम उदाहरण राहिला आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट रौप्यपदक जिंकून पुनरागमन केले होते. मात्र, २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि पदक अगदी थोडक्यात निसटले होते. अखेर तीन वर्षांनंतर पुन्हा जपानच्याच भूमीवर नागोया येथे तिने शानदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आणि आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा संपूर्ण पदक संग्रह परिपूर्ण केला.





