ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण आणि कचरा प्रकल्पाचा खोळंबा

पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

– प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पिंपरी-चिंचवड : शहर आणि परिसरातील नदी प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापनाच्या तीन स्वतंत्र घटनांमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आळंदीत इंद्रायणी नदीवर विषारी फेस, चिंचवडमध्ये पवना नदीही फेसाळल्याची घटना आणि मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प गेले तीन महिने बंद असल्याने कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

इंद्रायणी नदीत पुन्हा विषारी फेस

आळंदी येथे कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीत पुन्हा विषारी फेसाची चादर पसरल्याचे समोर आले आहे. सिद्धबेट ते पुंडलिक मंदिर परिसरात रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. चिखली, कुदळवाडी आणि मोई भागातील औद्योगिक कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात असून, पावसाचा जोर ओसरल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा प्रश्न असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पवना नदीही फेसाळली

चिंचवड परिसरातही सोमवारी रात्री पवना नदी फेसाळल्याची घटना घडली. अर्ध्या तासात पन्नास मिलिमीटर पाऊस झाल्याने नदीच्या पाण्यात वाढ झाली आणि रात्री नऊ ते अकराच्या सुमारास नदी फेसाळल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, फेस येण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र नदी वारंवार फेसाळण्याच्या घटनांमागील मूळ कारणांचा शोध अद्याप अपूर्ण असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्री फडणवीस बांधावर पोहोचताच शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला; भावूक होत मुख्यमंत्र्यांनी धीर दिला

वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प तीन महिने बंद

मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील चिमणी दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने सन २०२३ पासून सुरू असलेला हा प्रकल्प गेले तीन महिने बंद आहे. परिणामी दररोज सुमारे एक हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनीही प्रकल्प नेमका कधी सुरू होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. उर्वरित कचऱ्यासाठी बायोमायनिंगची नवी निविदा काढण्यात येणार असून, जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेऊन मुख्य अभियंत्यांना प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.

नागरिकांचा सवाल

या तिन्ही घटनांमुळे शहराच्या पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. वारीपूर्वी नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा प्रकल्प वेळेत सुरू करणे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button