Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एसटी महामंडळाची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मोठी तयारी; ताफ्यात दाखल होणार २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

दिवसा ४५ आसनी आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा; मोबाईलवरून बुकिंगसह डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरही आरक्षणाची तयारी

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासी सेवेत नवे पाऊल टाकण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच एसटी महामंडळाच्या ताफ्यात व्होल्वो बसेसचा समावेश होणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

हेही वाचा –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा; नागरिकांसाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रम

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ४५ आसनी आरामदायी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

मोबाईलवरून तिकीट बुकिंग

नव्या आराम बससेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल आरक्षण व्यवस्था. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेसोबतच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे.

त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे.

खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन

प्रवाशांना केवळ आरामदायी बस नव्हे, तर दर्जेदार प्रवासी सेवेचा अनुभव मिळावा यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, स्वच्छता, मूलभूत सुविधा, आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे.

मागणी असलेल्या मार्गांचा अभ्यास

महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा विचार करून मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटीचे राज्यभरातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा विश्वास याला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देण्याचा प्रयत्न आहे.

नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या सेवेला आधुनिक सुविधांची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधांनी युक्त प्रवासाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button