Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नागपूरच्या ‘अमृत २’च्या कामांना मार्च २०२७ची डेडलाइन; गुणवत्तेशी तडजोड न करण्याचे फडणवीस यांचे निर्देश

रस्ते खोदकाम व पुनर्भरणासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश; पोहरा नदी प्रदूषणमुक्तीसाठी एसटीपी आणि पंपिंग स्टेशनची कामे

नागपूर : नागपूर शहरात ‘अमृत २’ योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘अमृत २’ अंतर्गत सुरू असलेली विकासकामे तसेच पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन या विषयांवर रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रस्ते पुनर्भरणाच्या कामांचा आढावा

बैठकीत ‘अमृत २’ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. विविध प्रभागांमध्ये खोदकाम व पुनर्भरणामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी नगरसेवकांनी मांडल्या. रिंग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांबाबतही बैठकीत मुद्दे उपस्थित करण्यात आले.

आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली. स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी यांनीही पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाची माहिती दिली.

हेही वाचा –  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची सूक्ष्म तयारी; गिरीश महाजनांचे यंत्रणांना समन्वयाचे निर्देश

वैज्ञानिक पद्धतीने पुनर्भरण करा’

सिमेंट रस्त्यांवरील पुनर्भरण किंवा खड्डे बुजविताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीचा सक्तीने अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

भविष्यातील रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या प्रक्रियेसाठी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विविध विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे आणि कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांवर सक्त कारवाई करावी, अशी ताकीदही त्यांनी दिली.

पोहरा नदी पुनरुज्जीवनाला चालना

महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘अमृत २’ योजनेतील कामांसह पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली.

या प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) उभारण्यात येणार आहेत. जयताळा येथे १० एमएलडी आणि चिखली येथे ३५ एमएलडी क्षमतेचे एसटीपी उभारण्यात येणार असून, चिंचभवन, बीडीपेठ आणि सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

या प्रकल्पांमुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासोबतच पोहरा नदीचे प्रदूषण कमी करून नदी पुनरुज्जीवनाला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button