दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार; दत्तात्रय भरणेंचे निर्देश
पीकविमा लाभासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करा; चारा, पाणी आणि अखंडित वीजपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना
नांदेड : मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. पीकविम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, विविध खासदार, आमदार, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
७६ तालुक्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
मराठवाड्यातील ७६ तालुक्यांमध्ये कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना भरणे यांनी दिल्या.
“शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे. त्यांच्या अडचणी आणि म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे भरणे यांनी सांगितले.
पीकविमा आणि नुकसानभरपाईवर भर
पीकविम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले.
सॅटेलाईटच्या माध्यमातून विमा संरक्षणासंदर्भातील बाबी तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असेही भरणे यांनी सांगितले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा – नागपूरच्या ‘अमृत २’च्या कामांना मार्च २०२७ची डेडलाइन; गुणवत्तेशी तडजोड न करण्याचे फडणवीस यांचे निर्देश
पाणी, चारा आणि वीजपुरवठ्याचे नियोजन
ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. संकटाच्या काळात शासन शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यात सध्या विजेचा तुटवडा नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यात ५६ लाख शेतकऱ्यांना ४० हजार ३८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित बँकांनी कार्यवाही करावी, तसेच कर्जमाफीची यादी बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही देण्यात आले.
लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर प्रभावी अंमलबजावणी
बैठकीत लोकप्रतिनिधींनी पीक नुकसान, चारा व पाणीटंचाई, जलजीवन मिशन, जलसंधारण आणि अखंडित वीजपुरवठ्यासह विविध विषयांवर सूचना मांडल्या. या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.
बैठकीस नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




