Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची सूक्ष्म तयारी; गिरीश महाजनांचे यंत्रणांना समन्वयाचे निर्देश

३१ ऑक्टोबरच्या सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी कामांना गती द्यावी; भाविकांच्या सुविधा, वाहतूक, आरोग्य आणि पायाभूत विकासाला प्राधान्य

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करण्याचे निर्देश कुंभमेळा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी. तयारीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते.

रामकुंड, कुशावर्त परिसरात धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनाची माहिती दिली. रामकुंड, कुशावर्त तसेच नील पर्वत परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदावरी आरती, दिव्य संध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, कुंभ गीत आणि शंखनाद आदी कार्यक्रम प्रस्तावित आहेत. तसेच संकेतस्थळ आणि कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा –  ‘फळपिक विमा भरपाईतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करुन शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्या’; पालकमंत्री नितेश राणे

भाविकांच्या सुविधांना प्राधान्य

कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. ध्वजारोहण सोहळ्याचे व्यापक नियोजन करताना वस्त्रांतरगृहे, स्वच्छतागृहे, सूचना केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि भाविकांच्या निवासासाठी खोल्यांची उपलब्धता यांचा आढावा घेण्यात आला.

त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंग देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि वाहनतळांचे नियोजन यांनाही प्राधान्य देण्याच्या सूचना लोकप्रतिनिधी, साधू-महंत यांनी केल्या. या सूचनांचा नियोजनात समावेश करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्व यंत्रणांमध्ये समन्वयावर भर

बैठकीत खासदार डॉ. बच्छाव, खासदार भगरे, आमदार ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार तसेच विविध साधू-महंत आणि पुरोहित संघाच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या.

यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button