Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नागपूरच्या वाहतुकीला नवी दिशा; इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण, ‘न्यू नागपूर’च्या विकासाला गती

८.९० किमीच्या उड्डाणपुलामुळे उत्तर-दक्षिण नागपूरची कनेक्टिव्हिटी मजबूत; सुमारे ₹१,००० कोटींच्या प्रकल्पात अत्याधुनिक UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर

नागपूर : पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर शहराला अधिक सुव्यवस्थित आणि भविष्यातील विस्तारासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शहराच्या वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे.

कवी सुरेश भट सभागृहात झालेल्या लोकार्पण सोहळ्यास महसूल तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, संजय भेंडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

८.९० किमीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

इंदोरा चौक ते दिघोरी चौक असा सुमारे ८.९० किमीचा हा कॉरिडॉर असून, त्यातील ६.३७ किमीचा भाग उड्डाणपुलाचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) NH-353D वर सुमारे ₹९९७.४४ कोटी खर्चातून हा प्रकल्प उभारला आहे. दोन मार्गिका असलेल्या या उड्डाणपुलाची रुंदी १२ मीटर आहे.

उड्डाणपुलामुळे इंदोरा-दिघोरी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. गडकरी यांच्या माहितीनुसार, इंदोरा ते दिघोरी प्रवासाचा वेळ पूर्वीच्या सुमारे एका तासावरून १० ते १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या प्रकल्पात Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे मोठे स्पॅन उभारणे आणि कमी आधारस्तंभांमध्ये उड्डाणपुलाची रचना करणे शक्य झाले आहे. प्रकल्पात ९० मीटरपर्यंतचे स्पॅन, दोन ROB आणि १३.८२ किमी सर्व्हिस व स्लिप रोडचा समावेश आहे.

अशोक चौक येथे उड्डाणपुलासाठी विशेष उंचावलेला रोटरी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भागात स्थानिक वाहतूक आणि उड्डाणपुलावरील वाहतूक यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी रॅम्पची सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा –  पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

नागपूरच्या भविष्यातील विस्ताराला चालना

नागपूर शहरात सध्या ३५ उड्डाणपूल असून आणखी १५ उड्डाणपूल प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाह्य रिंगरोडनंतर शहराच्या आगामी विस्तारासाठी आणखी एका रिंगरोडचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. रोजगारकेंद्रित ‘न्यू नागपूर’ विकसित करण्याचे नियोजन असून, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी नवीन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विकासप्रकल्प

नागपूर शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन मोठे विकासप्रकल्प राबविण्याचे नियोजन असून, शहरासाठी आगामी काळात ₹१,००० कोटींची तरतूद उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दीक्षाभूमीच्या विकासाचा आराखडाही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

या उड्डाणपुलामुळे नागपूरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागातील कनेक्टिव्हिटीला चालना मिळण्यासोबतच शहराच्या वाढत्या वाहतुकीसाठी पर्यायी आणि वेगवान मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नागपूरच्या शहरी पायाभूत सुविधांच्या विस्तारात या प्रकल्पाची भर पडली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button