पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
बावनकुळेंनी तिवसा तालुक्यात बांधावर जाऊन सोयाबीन, कापूस, तुरीच्या नुकसानीची पाहणी; पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाअभावी सोयाबीनचे दाणे परिपक्व होण्यास अडथळा निर्माण झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक नुकसानभरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पालकमंत्री बावनकुळे यांनी तिवसा तालुक्यातील किशोर पिंपळे आणि राजू बहाद्दरपुरे यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण पोटे, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.
तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश
पावसाअभावी सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणीचा अहवाल शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पिकांची पाहणी करताना मोबाईल नेटवर्क किंवा संपर्काची समस्या निर्माण झाल्यास संबंधित ठिकाणचे पंचनामे ऑफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
हेही वाचा – दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार; दत्तात्रय भरणेंचे निर्देश
कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश
सध्याच्या परिस्थितीत कापूस, तूर आणि संत्रा पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास ही पिके काही दिवस तग धरू शकतील, अशी स्थिती आहे. मात्र काही भागांत कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सिंचनात अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केल्या.
याची दखल घेत बावनकुळे यांनी शेताच्या बांधावरूनच संबंधित सचिव लोकेशचंद्र यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वीजपुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नादुरुस्त सौर कृषीपंपांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना दोन दिवसांत बोलावून काम करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाचा पाठपुरावा
पिकांची स्थिती लक्षात घेता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. गेल्या वर्षीही अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना १,१४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रियाही सुरू आहे. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक सवलती आणि मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.





