दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन; अतुल सावे यांचा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा आदेश
पीक, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि वीजपुरवठ्याचा आढावा; संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजनाच्या सूचना

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि नियमित वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाचा खंड तसेच पर्जन्यमानातील अनियमिततेचा परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, संभाव्य नुकसान लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याच्या सूचना सावे यांनी दिल्या.
हेही वाचा – MITACSCच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; १७० हून अधिक जणांचा सहभाग
पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने नियोजन
दुष्काळसदृश्य परिस्थितीत उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिक आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना आतापासूनच करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही सावे यांनी आढावा घेतला. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा, पाणी आराखडा आणि वीजपुरवठ्याबाबतची माहिती सादर केली. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर उपाययोजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित सद्यस्थिती आणि प्रस्तावित उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली.





