बांबू लागवडीवर भर; ‘ब्ल्यू बेरी’नंतर महाराष्ट्रात शेतीच्या नव्या प्रयोगांना चालना
दरे गावातील शेतात जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त लागवड; दुष्काळसदृश भागात तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यातील दरे गावात आले आहेत. दरे येथील त्यांच्या शेतीमध्ये विविध कृषी प्रयोग करण्यात येत असून, जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त त्यांच्या शेतात बांबूची लागवड करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी बांबू लागवडीचे महत्त्व सांगत शेतकऱ्यांनी बांबूच्या शेतीकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.
बांबूपासून इथेनॉलसह विविध प्रकारच्या उपयुक्त वस्तू तयार करता येतात. त्यामुळे बांबू लागवडीवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या शेतात यापूर्वी सफरचंद आणि ब्ल्यू बेरीची लागवड करण्यात आली असून, या प्रयोगांना यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कापूर आणि हिंग या नवीन वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे.
‘ब्ल्यू बेरी’च्या यशस्वी प्रयोगावर भर
आजपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणावर ब्ल्यू बेरीची आयात केली जात होती. मात्र, महाराष्ट्रातील वातावरणातही ब्ल्यू बेरीची लागवड करता येऊ शकते, हे दरे येथील प्रयोगातून दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीमध्ये विविध पिकांचे प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा – मोदींची २३-२४ सप्टेंबरला ‘चिंतन बैठक’; कॅबिनेट फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण
‘गावी आलो तरी विरोधकांना पोटदुखी’
दरम्यान, आपल्या लंडन दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘मी गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलो आहे. मी नाराज नाही. मात्र, मी या भागात आल्यानंतर नेहमीच काही लोकांना पोटदुखी होते,’ असे ते म्हणाले.
‘गावी आलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी होते. त्यांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन. मी कामाचा माणूस आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळसदृश परिस्थितीवरही भाष्य
राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, संबंधित भागांचे पालकमंत्री दौरे करत आहेत. आपणही लवकरच दुष्काळी भागांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या भागांमध्ये पिके करपून गेली आहेत, तेथे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.





