दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आधुनिक निर्मिती केंद्र म्हणून विकास; कलाकार-तंत्रज्ञांसाठी सुविधांना बळ
स्टुडिओ क्रमांक एकचे लोकार्पण; तीन रुग्णवाहिका, मोफत बससेवा आणि अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे. कलाकारांसाठी अधिक सुविधा, तंत्रज्ञांसाठी नव्या संधी आणि युवा पिढीसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत विविध लोकसेवा व सांस्कृतिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शेलार बोलत होते. फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि गायक उपस्थित होते.
स्टुडिओ क्रमांक एकचे लोकार्पण
चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एकचे मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना चित्रीकरण व निर्मितीसाठी अधिक सुविधा मिळणार आहेत. चित्रनगरीचा आधुनिक निर्मिती केंद्र म्हणून विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा – दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन; अतुल सावे यांचा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा आदेश
आरोग्य सुविधांना बळ
कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’च्या माध्यमातून दोन नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वीच्या एका रुग्णवाहिकेसह आता चित्रनगरीत एकूण तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच तंत्रज्ञ, निर्मिती संस्थांचे कर्मचारी आणि संबंधित मनुष्यबळासाठी विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे चित्रनगरीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाला सुविधा मिळणार आहे.
अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
चित्रनगरीतील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत उभारलेल्या या यंत्रणेत प्रत्येक टप्प्यासाठी १५ लाख लिटर क्षमतेची अग्निशमन पाणी साठवण टाकी आणि स्वतंत्र फायर पंप प्रणाली आहे.
या यंत्रणेमुळे १५ स्टुडिओंसह प्रशासकीय इमारत, हेलिपॅड, खंडाळा घाट आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थान परिसराची अग्निसुरक्षा अधिक सक्षम झाली आहे. अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणारी महाराष्ट्र शासनाची पहिली शासकीय मालमत्ता म्हणून चित्रनगरीने महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे सांगण्यात आले. यावेळी नूतन समिती कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले.
युवा कलाकारांसाठी डिजिटल व्यासपीठ
युवा पिढीला डिजिटल माध्यमातून कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी रील स्पर्धा आणि रील व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री महागणपतिस्तोत्र’ संगीत व्हिडिओ आणि ‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भक्ती व संगीत परंपरेला आधुनिक माध्यमांची जोड देण्यात आली आहे.
‘लेन्स अँड लेगसी’ प्रदर्शनाचे उद्घाटन
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि चित्रनगरीच्या संयुक्त विद्यमाने ‘लेन्स अँड लेगसी : बॉलिवूडचा दृक्-प्रवास’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास दुर्मीळ छायाचित्रे, पोस्टर्स आणि अभिलेखीय साहित्याच्या माध्यमातून या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’चा संदर्भ देताना शेलार यांनी जनसेवा, कर्मचारी सेवा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकांनीही सेवाभाव जोपासत देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे आणि विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आपापल्या परीने योगदान देण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहन त्यांनी केले.





