परदेशात जाण्याची गरज कमी होणार; महाराष्ट्रात सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, फडणवीस यांची माहिती
UWAच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन; नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये ८० हजार ते १ लाख विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा

मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता भारतातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा (UWA) मुंबई कॅम्पसही सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
मुंबईतील UWA कॅम्पस सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात न जाता जागतिक स्तरावरील विद्यापीठात शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. UWAच्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई कॅम्पसमध्ये कॉम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिझनेस मॅनेजमेंट आणि MBA यांसारख्या अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध आहे.
तीन विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती
UWAने ‘Chief Minister Scholarship’ अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देशातच उपलब्ध झाल्याने परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च आणि त्यातून होणारा परकीय चलनाचा वापर कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
UWAच्या मुंबई कॅम्पसमध्ये शिक्षणासोबतच संशोधन आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या माहितीनुसार, मुंबई कॅम्पस अंधेरी पूर्व येथे असून, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, वित्त, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राशी जोडलेल्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे.
हेही वाचा – मच्छीमारांना मासेमारी बंद काळात २० ते २२ हजारांचे अनुदान?; नितेश राणेंचे सूतोवाच
नवी मुंबईत उभारणार ‘एज्युकेशन सिटी’
महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या करारानुसार विविध विद्यापीठांचे कॅम्पस टप्प्याटप्प्याने विकसित केले जात आहेत. सध्या सुरू करण्यात आलेले काही कॅम्पस तात्पुरत्या स्वरूपाचे असून, या विद्यापीठांचे मुख्य कॅम्पस नवी मुंबईतील प्रस्तावित ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या एज्युकेशन सिटीमध्ये सुमारे ८० हजार ते एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढणार
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत महाराष्ट्र सरकारचे करार आता प्रत्यक्षात येत असून, त्यातून मुंबईचे शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. UWAने भारतातील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. मुंबईनंतर UWAचा चेन्नई कॅम्पस ऑक्टोबर २०२६मध्ये सुरू होणार आहे.





