Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा; ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाजातील पात्र लाभार्थी शोधण्यावर भर; वनहक्क दावे, पांदण रस्ते आणि घरकुल पट्ट्यांच्या कामांना गती

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसेच विविध वंचित घटकांतील पात्र नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेने पात्र लाभार्थ्यांचा शोध घ्यावा. तसेच आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे बावनकुळे यांनी सांगितले.

अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना सौर योजनेचा लाभ

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील, १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या निधीव्यतिरिक्त आवश्यक निधीची तफावत जिल्हा नियोजन समिती किंवा संबंधित विभागांच्या निधीतून पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पात्र कुटुंबांना ही योजना संपूर्ण अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्यावर भर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याची आवश्यकता नाही, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने आणि प्रचलित नियमांनुसार हे धान्य गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करावी. या उपक्रमाचाही ‘सेवा संकल्प अभियानात’ समावेश करावा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

हेही वाचा –  मुंबईच्या गणेशोत्सवाचे परदेशी वाणिज्यदूतांकडून दर्शन; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जगभर ओळख

वनहक्क दाव्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम

वनहक्क दाव्यांवरील कार्यवाहीला गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी वनहक्क ग्राम समित्यांच्या बैठका घेऊन दाव्यांची छाननी व मंजुरीची कार्यवाही करावी. ३० सप्टेंबर तसेच १ आणि २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन दावे मंजूर करावेत.

उपविभागीयस्तरीय समित्यांच्या बैठका ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी, तर जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात याव्यात. आदिवासी विकास आणि महसूल विभागाने यासाठी समन्वयाने काम करावे. वनहक्क पट्टे मिळालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्याची कार्यवाहीही तातडीने करावी, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पांदण रस्त्यांना मिळणार स्वतंत्र संकेतांक

अभियानांतर्गत पांदण रस्त्यांना क्रमांक देऊन त्यांचे ग्रीड तयार करावे. नवीन पांदण रस्त्यांचा शोध घेऊन पात्र कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी आणि कामे सुरू करावीत. यामुळे पांदण रस्त्यांची अधिकृत नोंद तयार होऊन प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र संकेतांक मिळेल. भविष्यात या रस्त्यांच्या विकासाचे नियोजन करणेही सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

पात्र अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची कार्यवाही

१ जानेवारी २०११ पूर्वी रहिवासी क्षेत्रात किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना प्रचलित शासन निर्णय आणि निकषांनुसार पट्टे देण्याचा कार्यक्रमही अभियानांतर्गत राबवावा. ‘सेवा संकल्प अभियानाची’ माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक समाजमाध्यम प्रभावकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या.

सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून पात्र नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा. विविध विभागांनी रिक्त पदांची स्थिती तपासून आवश्यक मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावीत. तसेच बिंदुनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button