TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी’; फडणवीस यांचा हल्लाबोल

दुष्काळाची परिस्थिती सरकारने गांभीर्याने घेतली; पाणी-चाऱ्याची व्यवस्था सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका करत, ‘राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी आहे’, असे वक्तव्य केले. राहुल गांधी भारतीयांनी त्यांचे नेतृत्व नाकारल्याचे मान्य करत नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला. ‘जखम कपाळाला आहे आणि पट्टी गुडघ्याला बांधत आहेत’, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मुंबईत शुक्रवारी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या (UWA) मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नाव व चिन्हांबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर फडणवीस म्हणाले की, आपला पराभव लपवण्यासाठी राहुल गांधी विविध मुद्दे उपस्थित करत आहेत. भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले आहे, हे ते मान्य करत नसल्याचा दावा त्यांनी केला. लोक मोदींच्या मागे का आहेत, हे राहुल गांधींना समजेल, त्यावेळी त्यांच्या निवडणुकीतील पराभवाचे कारणही स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांच्या पत्रावर फडणवीसांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. पवारांनी प्रभावित भागात तातडीने मदत देण्याची मागणी केली असून, पीक नुकसानीसाठी आर्थिक मदतीची मागणीही केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी राज्य सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीवर आधीच उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचे कामही सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ५ ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील आणि त्याआधारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF)कडून मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या पत्राचे स्वागत करताना या विषयाला राजकीय रंग न देता पवारांकडून आणखी काही सूचना आल्यास त्यांचाही विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा –  साखरेच्या दरात २५ टक्क्यांची घसरण; सरकारच्या नव्या नियमामुळे ग्राहकांना आणखी दिलासा मिळणार?

UWAच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

दरम्यान, मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या (UWA) पहिल्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन झाले. UWAने १८ सप्टेंबरला मुंबई कॅम्पस सुरू केला असून, हा भारतातील विद्यापीठाचा पहिला आंतरराष्ट्रीय शाखा कॅम्पस आहे.

महाराष्ट्रात सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या विद्यापीठांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल, तसेच परकीय चलनाची बचत आणि संशोधनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. UWAच्या मुंबई कॅम्पसमध्ये तंत्रज्ञान, STEM आणि व्यवसायाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button