एकनाथ शिंदेंनी गुजराती भाषेतून भाषणाची सुरुवात; मोदींच्या कर्तृत्वाचे केले कौतुक
‘मोदीजींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होते’; वडनगरमध्ये एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार

वडनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील वडनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क गुजराती भाषेतून करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
“वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे. आज आ धरती ऊपर आवीने गर्व अनुभवूं छूं,” असे म्हणत शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या वतीने, साडेबारा कोटी जनतेच्या तसेच शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख केला.
हेही वाचा – CBFCच्या नव्या 18 सदस्यांची नियुक्ती; दिग्गज मराठी कलाकारांना संधी
“एनडीएच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे, यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे २५ वर्षे त्यांना आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या रूपात पाहणे आहे. ही गोष्ट आपल्या देशाचा अभिमान आहे,” असे शिंदे म्हणाले.
मोदी यांच्या वयापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले पाहिजे, असे सांगताना शिंदे यांनी त्यांच्या कार्याची तुलना हिमालय आणि अरबी समुद्राशी केली. “मोदीजींच्या बाबतीत आम्ही वयाचे आकडे मोजतच नाही हो, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीला आम्ही पाहतो. मोदीजींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होत असते आणि जनतेप्रती त्यांचे कार्य हे अरबी समुद्राच्या खोलीइतके मोजले जाते,” असे ते म्हणाले.
वडनगर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी असल्याने या भूमीवर येऊन आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. त्यांच्या गुजराती भाषेतील भाषणाच्या सुरुवातीची उपस्थितांमध्ये चर्चा झाली.





