CBFCच्या नव्या 18 सदस्यांची नियुक्ती; दिग्गज मराठी कलाकारांना संधी
मनोरंजन, संगीत, साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातील दिग्गजांचा बोर्डात समावेश; तीन वर्षांसाठी नियुक्ती

मुंबई : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात CBFCची केंद्र सरकारने नव्याने पुनर्रचना केली आहे. 16 सप्टेंबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार नव्या CBFCमध्ये 18 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, मनोज जोशी, प्रोसेनजीत चॅटर्जी, पल्लवी जोशी, रुपाली गांगुली आणि निशिगंधा वाड यांचा या मंडळात समावेश आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन, संगीतकार रिकी केज, समीक्षक विनोद अनुपम यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना संधी देण्यात आली आहे.
नव्या मंडळाची नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्यात आली असून, सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी असेल तेवढा असेल. ही नियुक्ती सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 आणि सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) नियम, 2024 अंतर्गत करण्यात आली आहे.
CBFC नेमके काय करते?
CBFC ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी वैधानिक संस्था आहे. भारतात चित्रपट सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करण्यापूर्वी त्यांना CBFCकडून प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. मंडळात विविध क्षेत्रांतील गैर-सरकारी सदस्य आणि अध्यक्ष असतात. चित्रपट परीक्षणाच्या प्रक्रियेसाठी प्रादेशिक कार्यालयांना Advisory Panelsची मदत मिळते.
चित्रपट प्रमाणनाची प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल असून e-Cinepramaan प्रणालीद्वारे अर्ज, प्रक्रिया आणि प्रमाणनाचे काम केले जाते.
हेही वाचा – मराठवाड्याच्या दुष्काळावर फडणवीसांचा मोठा दावा; ‘शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने उपाययोजना सुरू’
नव्या मंडळातील 18 सदस्य कोण?
- विनोद अनुपम : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. चित्रपट, संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करणाऱ्या समीक्षकाचा अनुभव ते मंडळात घेऊन येतात.
- मनोज जोशी : हिंदी, मराठी आणि गुजराती मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते. ‘हंगामा’, ‘भूल भुलैया’ आणि ‘फिर हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ते परिचित आहेत.
- अभिषेक जैन : गुजराती चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक. ‘केवी रिते जाईश’ आणि ‘बे यार’ यांसारख्या चित्रपटांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले.
- रिकी केज : तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार. भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्यात त्यांचे योगदान आहे.
- प्रियदर्शन : ‘हेरा फेरी’, ‘हंगामा’, ‘गरम मसाला’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक.
- सुनील शेट्टी : अॅक्शन, रोमँटिक, ड्रामा आणि कॉमेडी अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते.
- हंसराज हंस : पंजाबी लोकसंगीत आणि सूफी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक. अनेक दशकांचा संगीत क्षेत्रातील अनुभव त्यांच्या नावावर आहे.
- सुप्रिया यार्लगड्डा : तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्मात्या. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे.
- यतींद्र मिश्रा : कवी, लेखक आणि संगीत अभ्यासक. भारतीय संगीताच्या वारशावर त्यांनी लेखन केले आहे.
- रुपाली गांगुली : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘अनुपमा’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री.
- प्रीती झिंटा : ‘दिल से..’, ‘क्या कहना’, ‘कल हो ना हो’ आणि ‘वीर-झारा’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री. चित्रपट निर्मिती आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग राहिला आहे.
- नीला माधब पांडा : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक. सामाजिक आणि पर्यावरणविषयक विषयांवर आधारित चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.
- पंकज त्रिपाठी : ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’, ‘स्त्री’ आणि ‘मिर्झापूर’ यांसारख्या चित्रपट व मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेते.
- प्रोसेनजीत चॅटर्जी : बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते. मुख्य प्रवाहातील तसेच अभिनयप्रधान चित्रपटांमध्ये त्यांनी कम केले आहे.
- पल्लवी जोशी : दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे.
- निशिगंधा वाड : मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील अभिनेत्री. अभिनयासोबत लेखन आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे.
- वामन केंद्रे : रंगभूमी प्रशिक्षण आणि नाट्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाशी त्यांचा संबंध राहिला आहे.
- रमेश पतंगे : लेखक, संपादक आणि सामाजिक भाष्यकार. समाज, संस्कृती, सामाजिक सुधारणा आणि घटनात्मक मूल्यांवर त्यांनी लेखन केले आहे.
शशी शेखर वेम्पती CBFCच्या अध्यक्षपदी
CBFCचे अध्यक्ष म्हणून शशी शेखर वेम्पती यांची नियुक्ती मे 2026 मध्ये करण्यात आली होती. माजी अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पद सोडल्यानंतर वेम्पती यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नव्या 18 सदस्यांच्या मंडळासोबत वेम्पती हेच अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
नव्या मंडळात अभिनय, दिग्दर्शन, संगीत, समीक्षा, लेखन आणि रंगभूमी अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याने चित्रपट प्रमाणन प्रक्रियेत या विविध अनुभवांचा सहभाग राहणार आहे.





