कोकणच्या निसर्गसंपदेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे; निधीची कमतरता भासू देणार नाही : मंत्री उदय सामंत
‘निसर्ग माहिती केंद्र’ संशोधनाचे केंद्र बनावे; ‘सिंधुरत्न’ आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

रत्नागिरी : कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करण्याची गरज आहे. या विषयावर संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास जिल्हा नियोजन समिती तसेच ‘सिंधुरत्न’ योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उद्योग तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन आणि कोनशिलेचे अनावरण डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वडपूजनाने करण्यात आली.
यावेळी माजी आमदार संजय कदम, विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई, प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर दिवाले, शशिकांत चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संशोधनातून पेटंट मिळवण्याचे आवाहन
कोकणातील एका विद्यार्थ्याने स्थानिक नाचणी पिकावर संशोधन करून पीएचडीसोबत पेटंट मिळवल्याचा दाखला देत डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक संसाधनांवर संशोधन करण्याचे आवाहन केले.
“आपल्या निसर्गरम्य परिसरावरही उच्च दर्जाचे संशोधन होऊ शकते. रत्नागिरी जिल्ह्यातील वनसंपदा आणि वन्यजीवांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून संशोधनाला नवी दिशा द्यावी,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – धुळ्यातील ३,५९८ शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा; दुसरी यादी जाहीर
‘निसर्ग माहिती केंद्र’ संशोधनाचे केंद्र व्हावे
निसर्ग माहिती केंद्र केवळ पर्यटनासाठी मर्यादित न राहता प्रत्यक्ष शिकवणारे आणि संशोधनाला चालना देणारे केंद्र बनावे, अशी अपेक्षा डॉ. सामंत यांनी व्यक्त केली.
सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळणारे पट्टेरी वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर यांसारखे वन्यजीव, त्यांची भ्रमणक्षमता आणि अधिवास यामागे मोठे शास्त्र आहे. या विषयाचे शास्त्रीय ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
निसर्ग माहिती केंद्र उभारल्याबद्दल डॉ. सामंत यांनी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि संपूर्ण वन विभागाच्या टीमचे कौतुक केले. या केंद्रामुळे नागरिक आणि पर्यटकांना कोकणातील जैवविविधतेची माहिती मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




