धुळ्यातील ३,५९८ शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा; दुसरी यादी जाहीर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन

धुळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ३,५९८ पात्र शेतकऱ्यांचा दुसऱ्या कर्जमुक्ती यादीत समावेश करण्यात आला आहे. शासनाने ११ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या या यादीमुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यादीतील शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्यातील ३.५५ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, महाआयटीच्या माध्यमातून योजनेचे पोर्टल तयार करण्यात आले आहे. बँकांनी या पोर्टलवर ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२.५८ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १०,११४.९० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये ७ ऑगस्ट रोजी ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५,०२८.६० कोटी रुपये, तर २४ ऑगस्ट रोजी ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५,०८६.३० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.
आता योजनेअंतर्गत ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये धुळे जिल्ह्यातील ३,५९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील एकूण २५,४७१ लाभार्थ्यांमध्ये अहिल्यानगर ९,४०४, धुळे ३,५९८, जळगाव ७,३१६, नंदुरबार १,३४५ आणि नाशिक जिल्ह्यातील ३,८०८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – म्हाळुंगे-बालेवाडीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा; १,०३२ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
बँक शाखा आणि ग्रामपंचायतींमध्ये यादी
दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’मध्ये देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही कर्जमुक्तीची यादी असून पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत जिल्हा बँकेशी संबंधित १५२ लाभार्थी आहेत. राज्यस्तरीय दुसऱ्या यादीतील ३ लाख ५५ हजार ६१४ लाभार्थ्यांपैकी ४१,०५१ लाभार्थी जिल्हा बँकांशी, तर ३ लाख १४ हजार ५६३ लाभार्थी व्यापारी बँकांशी संबंधित आहेत.
आधार प्रमाणीकरणानंतर कर्जखात्यात रक्कम
यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची गणना ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यावर जमा केली जाणार आहे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या काही लाभार्थ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक असली तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार पात्र कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
तसेच मृत शेतकरी, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.
“धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत समाविष्ट सर्व ३,५९८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. बँका आणि संबंधित यंत्रणांनीही लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून प्रक्रिया सुलभ करावी,” असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.





