Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बारामतीच्या शाळांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी मदत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे जिल्ह्यातील ६०० जिल्हा परिषद शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्याचा निर्णय; शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मूल्यांची रुजवणूक करण्याचे आवाहन

बारामती : शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. बारामती तालुक्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

पंचायत समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपसभापती विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी किशोर माने, तहसीलदार स्वप्नील रावडे, आरोग्य अधिकारी मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मूल्यांची रुजवणूक करावी. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात.

तंत्रज्ञानासोबत कौशल्याधारित शिक्षणावर भर

बदलत्या काळानुसार शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबत समस्या निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणाची जोड द्यावी. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करणारी सशक्त पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे पवार यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा –  कोकणच्या निसर्गसंपदेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे; निधीची कमतरता भासू देणार नाही : मंत्री उदय सामंत

जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल सुविधा

प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी, सायन्स सेंटर, समूह शाळा, आदर्श शाळा, दत्तक शाळा, प्रवेशोत्सव, आरोग्य तपासणी, सैनिकी शिक्षण, मोफत गणवेश आणि निपुण महाराष्ट्र अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील ६०० शाळा मॉडेल स्कूल

शिक्षकांचे प्रश्न, शाळांमधील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून यावर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील ६५ जिल्हा परिषद शाळांमध्ये ११ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावेळी आरटीईअंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी, मॉडेल स्कूलच्या कामांची प्रगती, शिक्षक भरती आणि ‘मिशन ३००’ अंतर्गत शाळांमध्ये होणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button