राज्यातील १८ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती; पिकांच्या नुकसानीचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन

नागपूर : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८ जिल्ह्यांतील परिस्थितीचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. संबंधित जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि इतर समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्देसूद व सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
बैठकीत मराठवाडा, विदर्भ तसेच इतर जिल्ह्यांतील पिकांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि मूग या पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. विदर्भात कापूस, मूग, उडीद आणि तुरीवर परिणाम झाला असून नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत संत्रा पिकाचेही नुकसान झाले आहे.
हेही वाचा – बारामतीच्या शाळांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी मदत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
ढगाळ वातावरणामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऊस कारखाने लवकर सुरू झाल्यास गळीत हंगामाचा कालावधी कमी होऊन चारा उपलब्धतेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड कमी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करावा, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्राप्त अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचाही विचार करून त्यांच्या सहकार्याने आवश्यक उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस खासदार माया इवनाते, आमदार प्रवीण दटके, मोहन मते, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त विपीन इटनकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




